नवी दिल्ली – आजकालच्या धावपळीच्या जगण्यात प्रत्येकवेळी साग्रसंगीत जेवायला, खायला वेळ मिळतोच असं नाही. मग त्या वेळेला जे उपलब्ध असेल ते खाल्लं जातं. त्यातला आपला सगळ्यात आवडीचा पदार्थ म्हणजे ब्रेड. हा पाव आपण सर्रास खातो. त्यातही ब्रेड बटर आवडीने आणि चवीने खाल्लं जातं. पण हा असा सातत्याने खाल्ला जाणारा पाव आपल्यासाठी फायदेशीर आहे का, याचा विचार कोणीच करताना दिसत नाही. त्याबद्दलच आम्ही थोडी माहिती देणार आहोत.
पावाबद्दल कितीही समज, गैरसमज असले तरी अनेकांच्या घरात आजही ब्रेकफास्ट म्हणून ब्रेड बटर खाल्ले जाते. व्हाइट ब्रेड तब्येतीला चांगला नाही म्हणून, ब्राऊन ब्रेड खाल्ला जातो. पण खरंच पाव चांगला असतो का?
पावामुळे वजन वाढते का?
जर तुम्ही नियमितरित्या चौरस आहार घेत असाल तर कधीतरी पाव खाल्ल्याने तुम्हाला फार त्रास होणार नाही. पण व्हाइट ब्रेड टाळावा. कारण, रिफायनिंगच्या प्रक्रियेतील त्यातील व्हिटॅमिन, मिनरल्स आणि फायबर नष्ट होते. पर्यायी म्हणून होलग्रेन, मल्टीग्रेन ब्रेड तुम्ही खाऊ शकता.
ग्लुटेन फ्री ब्रेड आरोग्यदायी असतो?
ग्लूटेन फ्री ब्रेड तब्येत चांगले ठेवण्याचे कसलेही आश्वासन देत नाही. उलट ग्लूटेनला पर्याय म्हणून त्यात साखर आणि अन्य काही त्रासदायक गोष्टींचा समावेश केलेला असतो. त्यामुळे तुम्हाला जर ग्लुटेनची ऍलर्जी असेल तरच या ब्रेडचा विचार करा. अन्यथा नाही.
ब्राऊन ब्रेड पौष्टिक असतो?
ब्राऊन ब्रेडमध्ये व्हाइट ब्रेडच्या तुलनेत साखर जास्त असते. तो चविष्ट बनावा यासाठी त्यात साखर जास्त प्रमाणात घातली जाते. याचा रंग गडद व्हावा यासाठी यात काही न काही घातले जाते.
ही माहिती वाचून पावासंबंधी तुमचे काही समज, गैरसमज दूर झाले असतील अशी आशा आहे.