लंडन – ब्रिटनमधील कोरोनाची स्थिती दिवसेंदिवस गंभीर होत असल्याचे दिसून येत आहे. प्रार्दुभाव सातत्याने वाढल्याने बाधितांची संख्याही वाढत आहे. गेल्या महिन्यात कोरोनाचा नवीन विषाणू सापडल्यानंतर येथे साथीचे प्रमाण लक्षणीयरित्या वाढले आहे. गेल्या २४ तासांत तबल्ल १२३९ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झला आहे. तर, याच २४ तासात तब्बल २८ हजार ६८० नवे बाधित झाले आहेत.
गेल्या डिसेंबरमध्ये ब्रिटनमध्ये कोरोनाचा नवीन विषाणू सापडला असून तो विषाणू अधिक संक्रामक असल्याचे नोंदविण्यात आले आहे. कोरोनाचा हा नवीन विषाणू आता जगातील ५० हून अधिक देशांपर्यंत पोहोचला आहे. अशी आहे विविध देशांमधील सद्यस्थिती
ब्रिटन – कोरोना संसर्ग रोखण्यासाठी कडक उपाययोजना केल्या जात असतानाही या साथीचा फैलाव थांबलेला नाही. या देशात कोरोनाविरूद्ध लसीकरण मोहीम ८ डिसेंबरपासून सुरू आहे. ब्रिटनमध्ये आतापर्यंत ३७ लाख ४३ हजारांहून अधिक लोक संक्रमित झाले आहेत. १ लाख ३ हजार १२६ जणांचा आतपर्यंत मृत्यू झाला आहे.
फ्रान्स – गेल्या २४ तासांत तब्बल २३ हजार ७७० नवीन रुग्ण आढळले आहेत तर ३४८ बळी गेले आहेत. फ्रान्समध्ये आतापर्यंत ३१ लाख ३० हजार रुग्ण सापडले आहेत. तर एकूण ७४ हजार ८०० रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
आफ्रिका – जागतिक आरोग्य संघटनेने असा इशारा दिला आहे की आफ्रिकेच्या अनेक देशांमध्ये कोरोनाच्या नवीन विषाणूने प्रवेश केला आहे. त्यामुळे या भागातील साथीच्या रोगाची दुसरी लाट आणखी वाढू शकते. दक्षिण आफ्रिका, नायजेरिया आणि केनियामध्ये कोरोनाचे नवीन रुग्ण आढळले आहेत.
ब्राझिल – गेल्या २४ तासांत ६१ हजार नवे बाधित आढळल्याने देशातील एकूण संक्रमितांची संख्या ९ लाखांपेक्षा जास्त झाली आहे. एकूण दोन लाख २१ हजार मृत्यू देशात झाल्याने चिंता व्यक्त होत आहे.