ब्राझील – कोरोनाचा वाढता प्रदुर्भाव लक्षात घेता जगभरात लस तयार करण्याचे काम सुरु आहे. जगभरात कोरोनाची प्रभावी लस तयार कारण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. अशातच कोरोना विषाणूवरील लसीच्या ट्रायलसंदर्भात मोठी बातमी समोर आली आहे. ब्राझीलमध्ये कोरोना लसीच्या चाचणी दरम्यान एका स्वयंसेवकाचा मृत्यू झाल्याचे धक्कादायक वृत्त समोर आले आहे. ब्राझीलमध्ये ऑक्सफर्ड युनिव्हसिटी कोरोना लसीच्या तिसऱ्या चाचणी दरम्यान ही घटना घडली आहे.
कोरोना लसीच्या चाचणीदरम्यान मृत्यू झालेला स्वयंसेवकाला लस देण्यात आली नव्हती. त्यामुळे लसीची चाचणी थांबवली जाणार नसल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे. ब्लूमबर्गने दिलेल्या माहितीनुसार, लसीच्या सुरक्षेबाबत चिंता करण्याची गरज नसल्याचे ऑक्सफर्डमधील संशोधकांनी सांगितले आहे. मृत्यू झालेला स्वयंसेवक ब्राझीलमधील असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. चाचणी दरम्यान स्वयंसेवकांना लस किंवा प्लेसबो डोस देण्यात आला की नाही हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. ब्राझीलची आरोग्य संस्था अविसा एन्विसा यांनी वैद्यकीय गोपनीयतेच्या कारणास्तव अधिक माहिती उघड करण्यास नकार दिला आहे. संबंधित घटनेचा स्वतंत्रपणे आढावा घेतला जात असल्याचे डॉक्टरांनी म्हटले आहे. ब्राझीलमधील प्रकरणाचे काळजीपूर्वक मूल्यांकन केल्यावर, क्लिनिकल चाचण्यांच्या सुरक्षिततेबद्दल आणि स्वतंत्र पुनरावलोकन केले जाईल असे सांगण्यात आले आहे. तूर्तास, लसीची चाचणी सुरूच ठेवावी अशी शिफारस करण्यात आली आहे.