दिंडोरी:- प्रादेशिक विद्या प्राधिकरण, नाशिक यांच्यावतीने नुकतीच दोन दिवसीय विभागस्तरीय ऑनलाईन कठपुतली निर्मिती कार्यशाळा नाशिक विभागातील नाशिक, धुळे, जळगाव व नंदुरबार जिल्ह्यातील शिक्षकांसाठी आयोजित करण्यात आली होती. कार्यशाळेचे ऑनलाईन उद्घाटन प्रादेशिक विद्या प्राधिकरण, नाशिकचे प्राचार्य तथा उपसंचालक जालिंदर सावंत यांच्या हस्ते करण्यात आले. प्रादेशिक विद्या प्राधिकरण, नाशिकच्या अधिव्याख्याता तथा ऑनलाईन प्रशिक्षणाच्या समन्वयक डाॅ. संगिता महाजन यांच्या संकल्पनेतून या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. कार्यशाळेत सहाणेमळा, तालुका संगमनेर शाळेच्या मुख्याध्यापिका संगीता पुंडगे या प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होत्या. ऑनलाइन अध्यापनामध्ये कठपुतली बाहुल्या विद्यार्थ्यांसाठी आनंददायी शिक्षण देण्यासाठी नक्कीच उपयुक्त ठरतील, जास्तीत जास्त शिक्षकांनी कार्यशाळेचा लाभ घ्यावा असे आवाहन उपसंचालक जालिंदर सावंत यांनी उपस्थितांना करून सर्व प्रशिक्षणार्थ्यांना कार्यशाळेसाठी शुभेच्छा दिल्या.
सदर प्रशिक्षणासाठी विभागातील विविध जिल्ह्यांमधील एक हजार पेक्षा जास्त शिक्षकांनी झूम मिट व फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून ऑनलाईन उपस्थित राहून प्रशिक्षणाचा लाभ घेतला. कार्यशाळेच्या सुलभक संगीता पुंडगे यांचा परिचय डॉ. संगीता महाजन यांनी करून दिला. कठपुतलीची बॉडी बनवण्यासाठी हात-पाय, डोके व धडाचा भाग कसा बनवायचा याचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक करून दाखविण्यात आले. तसेच कठपुतलीच्या बॉडीला ड्रेस व केस कसे लावायचे, कठपुतलीच्या हातापायाला व डोक्याला दोरा बांधून त्या कशा अडकवायच्या आदींचे प्रात्यक्षिक करून दाखविले. त्यानंतर प्रत्यक्ष सादरीकरणनाद्वारे कठपुतली कशी चालवायची, कठपुतली दोरी द्वारे कशी फिरवायची याचे प्रात्यक्षिक करून दाखविले. याप्रसंगी त्यांनी बनवलेल्या विविध फिंगर पपेट, हात पपेट, स्टिक पपेट अशा विविध बोलक्या बाहुल्या दाखवून बोलक्या बाहुलीचे इंग्रजी संभाषण तसेच गीत गायनाचे सादरीकरण केले. कार्यशाळेत
धुळे डायटच्या प्राचार्या प्रतिभा भावसार, नाशिकचे ज्येष्ठ अधिव्याख्याता योगेश सोनवणे व शिवाजी औटी यांनी उपस्थित राहून प्रशिक्षण समन्वयक डाॅ. संगिता महाजन व प्रमुख मार्गदर्शक संगिता पुंडगे यांचे ऑनलाईन कार्यशाळा आयोजित केल्याबद्दल विशेष अभिनंदन करून आभार मानले.