दिंडोरी – तालुक्यातील बोपेगाव कोविड सेंटरमध्ये अनेक सुविधांची वानवा असल्याचे समोर आले आहे. या सेंटरला खासदार डॉ. भारती पवार यांनी भेट दिली आणि तेथील परिस्थितीची पाहणी केली.
पाहणीनंतर डॉ. पवार यांनी सांगितले आहे की, ग्रामीण भागातील कोरोनाचा वाढता प्रादूर्भाव पाहता बोपेगाव येथील शासकीय आश्रमशाळा येथील कोविड सेंटरला भेट दिली. याठिकाणी अत्यावश्यक सेवेसाठी रुग्णवाहिकेची गरज आहे. तसेच, डॉक्टर आणि आरोग्य, सफाई कर्मचाऱ्यांचीही कमतरता आहे. उपचारासाठी दाखल रुग्णांना सकस आहार, योगा शिक्षक, स्टीमर यांचीही आवश्यकता असल्याचे दिसून आले. तसेच वणी येथे डी.सी. एच सेंटर असतांनाही ते कार्यान्वित नाही. त्यामुळे रुग्णांना इमर्जन्सी सेवा मिळण्यास अडचण येऊ शकते, असे डॉ. पवार यांनी सांगितले.
बोपेगावच्या कोविड सेंटरला रुग्णवाहिका, ऑक्सिजन सिलेंडर, स्टीमर, डॉक्टर ,आरोग्य कर्मचारी, सफाई कर्मचारी यांची नितांत आवश्यकता असल्याने जिल्हा वैद्यकीय अधिकारी व संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांशी बोलून त्या उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे डॉ. पवार म्हणाल्या. कोविड सेंटरमधील रुग्णांशीही त्यांनी संवाद साधला. या भेटीप्रसंगी तहसीलदार कैलास पवार, वैद्यकीय अधिकारी डॉ. बागरेचा, भाजपा तालुकाध्यक्ष नरेंद्र जाधव, भाजपा नेते प्रमोद देशमुख, संजय कावळे, विलास देशमुख, शहराध्यक्ष शाम मुरकुटे, योगेश बर्डे, तुषार वाघमारे आदी उपस्थित होते.