आदिवासी विकास मंत्री ॲड. के.सी.पाडवी यांची घोषणा
नाशिक – बोगस आदिवासांना आळा घालण्यासाठी त्याचबरोबर या जमातीच्या उद्योगाला चालना देण्यासाठी ‘आदिवासी हित संरक्षण कक्षाची ’ स्थापना करण्यात येणार आहे. तसेच सिकलसेल व इतर आजरांपासून आदिवासींचे रक्षण करण्यासाठी ‘आदिवासी आरोग्य संवर्धन कक्ष’ याची निर्मिती करण्यात येणार आहे, अशी माहिती आदिवासी विकास मंत्री ॲड. के.सी. पाडवी यांनी दिली आहे. आदिवासींचा आणि निसर्गाचा खूप जवळचा संबंध असल्याने या जमातीसाठी निर्सगाशी संबंधित एक त्रैमासिक सुरु करावे, असेही त्यांनी सांगितले.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मध्यवर्ती सभागृहात ‘आदिवासी गौरव दिना’चा राज्यस्तरीय कार्यक्रम ऑनलाईन पद्धतीने व्हिडीओ कॉन्फिरन्सिंगद्वारे आयोजित करण्यात आला होता, त्यावेळी मंत्री ॲड. पाडवी बोलत होते. आदिवासी विद्यार्थ्यांना नागरी सेवा परिक्षेच्या प्रवाहात आणण्यासाठी दिल्ली येथे आदिवासी विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह सुरु करावेत जेणेकरुन त्यांना स्पर्धा परिक्षेचे वातावरण अनुभवता येईल. त्यासाठी विद्यार्थ्यांकडून नाममात्र शुल्क आकारण्यात यावेत. डीबीटीबाबत तज्ज्ञ कमिटीची नेमणूक करुन त्याबाबत निर्णय घेण्यात येणार आहे, असे पाडवी यांनी सांगितले.
धान खरेदीसाठी गोडाऊन वाढवा: उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ
आदिवासींच्या विकासासाठी स्वातंत्र्य लढ्यात मोलाचे योगदान देणाऱ्या क्रांतीवीरांना अभिवादन करण्यासाठी आदिवासी गौरव दिन साजरा केला जात असून आज कोरोनामुळे आदिवासी विभागाने राबविलेला हा ऑनलाईन उपक्रम अतिशय स्तुत्य उपक्रम आहे. या दिनाचे औचित्य साधून येणाऱ्या काळात धान साठविण्यासाठी गोडावून विस्ताराने वाढवावीत तसेच आदिवासी सोसायट्यांना अधिक सक्षम करण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. वनपट्ट्याच्या जमीनी वाटप करण्याबरोबर त्यांचे सपाटीकरण करणे व इतर अनुषंगीक गोष्टीवर भर देण्यात यावा, अशा सूचना विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी यावेळी केल्या.
लॉकडाऊनमध्ये अभिनव काम : आयुक्त कुलकर्णी
लॉकडाऊनच्या काळात अभिनव पध्दतीने काम करणारे महाराष्ट्रातील आदिवासी विभाग एकमेव विभाग असल्याचे मत, नाशिकचे आदिवासी आयुक्त डॉ. किरण कुलकर्णी यांनी सांगितले. लॉकडाऊन काळात करण्यात आलेल्या कामांचा अहवाल ई-कनेक्ट नावाने तयार करण्यात आला आहे. निश्चितच हा अहवाल संपूर्ण देशाला मार्गदर्शक ठरेल असा विश्वास, कुलकर्णी यांनी व्यक्त केला.
यावेळी मंत्र्यांच्या हस्ते शिक्षणरथाचे उद्घाटन आणि अनलॉक लर्निंग शासकीय आश्रमशाळा, एकलव्य शाळा, वसतिगृह, आदिवासी विद्यार्थ्यांसाठी ऑडीओ क्लिप प्रोजेक्ट, रेडीओचा सांगाती या संवेदनशील उपक्रम, कनेक्ट रिपोर्ट प्रकाशन, यु-टयुब चॅनल/ई लर्निंग, ई-मॅगझिन इत्यादी उपक्रमांचे अनावरण करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अपर आयुक्त गिरीष सरोदे, सुत्रसंचालन सुचिता लासुरे व आभार प्रदर्शन नंदुरबारच्या प्रकल्प अधिकारी वसुमन पंत यांनी केले.
आता आदिवासी विकास मंथन दिन
दरवर्षी जागतिक आदिवासी गौरव दिन आपण मोठ्या जल्लोषात खुल्या मैदानात साजरा करत असतो. परंतु कोरोनाचा वाढत प्रादूर्भाव लक्षात घेता आपण हा दिवस ऑनलाईन पध्दतीने साजरा करतोय. आदिवासी गौरव दिन साजरा करत असतांना आदिवासी जमातीच्या वैचारिक जडण-घडणीसाठी आणि त्यांचा सर्वांगीण विकासासाठी हा दिवस ‘आदिवासी विकास मंथन दिवस’ म्हणून साजरा करण्यात यावा, असे पाडवी यांनी सांगितले.