मनाली देवरे, नाशिक
रविवारचा दिवस, सुपर संडे आणि आय.पी.एल. मध्ये रविवारचे दोन्ही रोमांचक सामने सुपर ओव्हरच्या आधारावर निकाली ठरावेत हा केवळ योगायोग म्हणावा लागेल. आयपीएलच्या १३ वर्षाच्या इतिहासात एकाच दिवशी दोन सामने सुपर ओव्हरच्या आधारे निकाली ठरण्याचा विक्रम रविवारी पहिल्यांदाच बघायला मिळाला. त्यातला मुंबई विरूध्द पंजाबचा सामना तर सुपर ओव्हर मध्ये देखील टाय झाल्याने आणखी एक सुपर ओव्हर खेळवावी लागली. थोडक्यात काय, रविवारी सगळाचा मामला सुपरहीट ठरला आणि क्रिकेट चाहत्यांचे लक्ष लागून राहीलेली यंदाच्या आयपीएलची रंगत आता दिवसागणिक वाढते आहे हेच रविवारी दिसून आले.
रविवारच्या खेळाचे आणखी एक वैशिष्टय म्हणजे सुपरस्टार शाहरूख खानच्या कोलकाता नाईट रायडर्स संघाने आणि प्रिती झिंटाच्या किंग्ज इलेव्हन पंजाब संघाने विजय मिळवले. रविवारी सनरायझर्स हैद्राबाद संघाने १६३ धावांचा पाठलाग करतांना ओढून आणलेली रोमहर्षक मॅच, सुपर ओव्हरमध्ये माञ कोलकाता नाईट रायडर्सने सहजपणे जिंकली. संध्याकाळी उशिरा झालेल्या दुस–या एका सामन्यात मुंबई इंडीयन्सने १७६ धावा केल्या होत्या, किंग्ज इलेव्हन पंजाब संघाने या धावसंख्येचा पाठलाग देखील केला आणि देान सुपर ओव्हरचा अडथळा पार करून मुंबईचा पराभव देखील केला.
मुंबई इंडीयन्स वि. किंग्ज इलेव्हन पंजाब सामन्यात मुंबईने प्रथम फलंदाजी करतांना १७६ धावांचे मोठे टारगेट पंजाब समोर ठेवले होते. डी कॉक च्या ५३ धावा, कुणाल पांडया आणि पोलार्डच्या प्रत्येकी ३४ धवा आणि कुल्टर नाईलची २४ धावांची छोटीशी परंतु तडाखेबाज खेळी या जोरावर ही धावसंख्या मुंबईने गाठली खरी परंतु या धावा मुंबईला विजयासाठी कमीच पडल्या. पंजाबचा के.एल.राहूल या सिझनमध्ये पहिल्या सामन्यापासून धावा करतोय. ऑरेंज कॅप सोडायला तो तयार नाही. या सामन्यातही धावा करायला तो चुकला नाही. ५१ चेंडूत तो ७७ धावा करून तो बाद झाला त्यावेळी पंजाबचा संघ पुन्हा पराभवाच्या छायेखाली आला होता. परंतु, ख्रिस गेल, पुरन आणि शेवटी दिपक हुड्डा यांनी छोटे छोटे योगदान देवून १७६ धावांचा पाठलाग करून दाखवला.
सुपरसे उपर ओव्हर
सुपर ओव्हर आणि जसप्रीत बुमरा यांचा एकमेकांशी चांगला स्नेह आहे. अशा ओव्हर मध्ये एकापेक्षा एक असे सरस यॉर्कर टाकायला बुमरा कधीच चुकत नाही. पहीली सुपर ओव्हर त्यानेच टाकली आणि अवघ्या ५ धावा दिल्या. परंतु, पंजाबकडेही मोहम्मद शामीसारखा मुरब्बी मोहरा आहे. त्याने देखील गोलंदाजीतला आपला अनुभव पणाला लावला आणि पहिली सुपर ओव्हर बरोबरीत सुटली. नियमानुसार पहील्या सुपर ओव्हरमध्ये जे खेळले, त्यांना दुस–या सुपर ओव्हरमध्ये खेळण्याची संधी नसल्याने सगळा डाव नव्याने रंगला. मुंबई इंडीयन्सकडे बुमरा साठी विकल्प नव्हता त्यामुळे रोहीतला बोल्टवर ही जबाबदारी टाकावी लागली आणि मग, अगदी पहिल्या सामन्यापासून जिंकण्यासाठी जीवापाड प्रयत्न करत आलेल्या पंजाबला दोन महत्वाचे गुण मिळवून देणारा विजय मिळाला. ख्रिस गेला म्हणाला होता, मीच युनिव्हर्स बॉस आहे आणि उरलेले सगळे सामने आम्ही जिंकणार आहोत. त्याने सुपर ओव्हरमध्ये बॉस नावातली धमकी सिध्द केली आणि संघात येण्यापुर्वी पॉईन्टस टेबलमध्ये अगदी तळाला गेलेल्या पंजाब संघाला 6 व्या क्रमाकांवर आणून बसवले आहे.
सुपर ओव्हरमध्ये केकेआरने जिंकली
दिवसातल्या पहिल्या सामन्यात शुभमन गिल (३६), इयान मार्गन (३४), दिनेश कार्तिक (२९) आणि नितीश राणा (३४) असे सांघिक योगदान लाभल्यामुळेच केकेआर संघाला १६३ धावांचे टारगेट प्रथम फलंदाजी करतांना उभारता आले होते. केकेआर विरूध्दच्या या सामन्यात सनरायझर्स संघाला सिझनमध्ये पुढे जाण्याची संधी होती. विजय मिळवता आला असता, तर केकेआरच्या गुणांशी बरोबरी केल्यामुळे चवथ्या स्थानावर झेप घेवून ते स्थान टिकविण्याचा सनरायझर्सचा गेमप्लान होता. पण हा गेमप्लान सुपर ओव्हरच्या अवघ्या ३ चेंडूत फेल ठरला आणि तिथेच हैद्राबादी बिर्याणीची चव देखील बिघडली. आता
१६३ धावांचा पाठलाग करतांना सनरायझर्स फलंदाजीत सातत्य दाखवलेही होते. सलामीच्या जोडीने सुरूवात चांगली करून दिली होती. बेअरस्टो (३६ धावा) आणि विल्यमसन (३९ धावा) या वैयक्तीक धावसंख्येवर बाद झाल्यानंतर मधल्या फळीत डेव्हीड वॉर्नरने नाबाद ४७ धावांची अनुभवी खेळी उभारतांना संघाला विजयाच्या जवळ नेले असतांनाच, सामना बरोबरीत सुटला. त्यानंतर माञ सुपर ओव्हरची अग्नीपरीक्षा पार करतांना बाजी मारली, ती केकेआरनेच.
लॉकी फर्ग्युसन ठरला “बाजीगर”
लॉकी फर्ग्युसन हा शाहरूख खानची टीम म्हणून ओळखल्या जाण्या–या केकेआर संघासाठी या सामन्यात “बाजीगर” ठरला. २० षटकांपैकी जी ४ षटकं त्याने टाकली त्यात त्याने अवघ्या १५ धावा देवून ३ बळी घेतले होते. हीच कामगिरी त्याने सुपर ओव्हरमध्ये देखील पार पाडली. फक्त ३ चेंडून २ धावा देवून डेव्हीड वॉर्नर आणि अब्दुल समद यांच्या सारखे दोन महत्वुपर्ण बळी घेतले.
सोमवारची लढत
सोमवारी चेन्नई सुपरं किंग्ज्ा आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात लढत होईल. अनुक्रमे ६ व ७ व्या क्रमांकावर असलेल्या दोन्ही संघांनी ९ सामन्यात अवघे ६ गुण मिळवले आहेत. जाणकांराच्या मते या दोन्ही संघाची स्पर्धेत टिकून रहाण्याची लढत अजुन संपलेली नाही. उलटफेर होवू शकतो हा जरी तर्क असला तरी तितकाच कठीण देखील आहे. या दोन्ही संघाना यापुढचा प्रत्येक सामना जिंकावा लागेल आणि त्याचवेळेला जे इतर संघ शर्यतीत आहेत त्यांनी प्रत्येक सामना गमवावा ही प्रार्थना करावी लागेल, अशी काहीशी चिन्हे आहेत. ब्राव्हो दुखापतग्रस्त आहे ही चेन्नईची डोकेदुखी तर सलग विजय मिळवता येत नाहीत ही राजस्थानची अडचण. त्यामुळे सोमवारी होणारी लढत महत्वाची ठरणार आहे.