नवी दिल्ली ः स्ट्रीमिंग व्यासपीठ असलेल्या नेटफ्लिक्सला बॉम्बे बेगम्स या वेब सीरिजमधून आक्षेपार्ह दृष्य हटवण्यासाठी राष्ट्रीय बाल अधिकार संरक्षण आयोगनं (एनसीपीसीआर) गुरुवापर्यंतची मुदत दिली आहे. ८ मार्चला आंतरराष्ट्रीय महिलादिनी प्रदर्शित झालेल्या सीरिजमध्ये काही दृष्यांवर आयोगानं नाराजी व्यक्त करत नेटफ्लिक्सला नोटीस पाठवली आहे.
बॉम्बे बेगम्सचं दिगदर्शन अलंकृता श्रीवास्तव यांनी केलं आहे. आयोगानं ११ मार्चला नेटफ्लिक्सला एक नोटीस पाठवून त्यामधील लहान मुलांसदर्भातील आक्षेपार्ह कंटेंट हटवण्यास सांगितलं. तसंच २४ तासांच्या आत उत्तर मागितलं आहे. नोटिशीचं उत्तर न दिल्यास कायदेशीर कारवाईचा इशारा देण्यात आला आहे.
वेब सीरिजमधील कंटेंट मुलांचं मन दूषित करेल. तसंच त्यांना शोषणाच्या मार्गावर घेऊन जाऊ शकतो. मुलांसंदर्भातील कंटेंट प्रसारित करताना नेटफ्लिक्सला विशेष दक्षता घ्यायला पाहिजे.
अल्पवयीन मुलांवर दाखवलेल्या कामूक आणि अमली पदार्थांच्या दृष्यांवर आयोगानं नाराजी व्यक्त केली असून ते तत्काळ हटवावेत असे निर्देश दिले आहेत. हे दृष्य जेजे अॅक्ट २०१५, पोक्सो अॅक्ट २०१२ आणि आयपीसी १८६० चं उल्लंघन केल्याचं आयोगानं म्हटलं आहे. कारण यात अल्पवयीन मुलांचा वापर केला गेला आहे.
नेटफ्लिक्सनं नोटिशीला उत्तर देण्यासाठी आपल्या लिगल टीमला वेळ मागितला आहे. नेटफ्लिक्सवर सीरिज बंद करण्यास सांगण्यात आलं आहे. ट्विटरवर काही यूजर्सनी यावर आक्षेप घेत बाल आयोगाकडे तक्रार केली होती. त्यानंतर आयोगानं नेटफ्लिक्सला नोटीस पाठवली आहे.