अपघातात तीघांचा मृत्यु
नाशिक : शहरातील बेशिस्त वाहतुकीमुळे अपघाताची मालिका सुरूच असून गुरूवारी (दि.२१) वेगवेगळया भागात झालेल्या अपघातांमध्ये तिघांचा हकनाक बळी गेला. या अपघातांमध्ये दोघे दुचाकीस्वार मित्र जखमी झाले असून मृतांमध्ये अनोळखी महिलेसह एका पुरूषाचा समावेश आहे. याप्रकरणी अंबड, सातपूर आणि गंगापूर पोलीस ठाण्यात मृत्युची नोंद करण्यात आली आहे.
महामार्गावरील बुब पेट्रोल पंपासमोर रस्ता ओलांडणा-या ४० वर्षीय महिलेस भरधाव फोर्च्युनर (एमएच ०६ बीएम २२२) या कारने चिरडले. हा अपघात गुरूवारी (दि.२१) दुपारच्या सुमारास झाला. चालकाचा आपल्या वाहनावरील ताबा सुटल्याने हा अपघात झाला. या अपघातात अनोळखी महिलेस कारने काही अंतरापर्यंत फरफटत नेल्याने तिचा चेंदामेंदा झाला असून अद्याप तिची ओळख पटली नाही. अपघातानंतर चालक वाहनासह पसार झाला असून याप्रकरणी जमादार शांताराम शेळके यांच्या तक्रारीवरून पसार झालेला कारचालक चेतन शिरसाठ (जेलरोड) याच्याविरोधात अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास उपनिरीक्षक शेवाळे करीत आहेत. दुसरा अपघात सातपूर कॉलनीत झाला. या अपघातात ४० वर्षीय अनोळखी पुरूषाचा मृत्यु झाला. नाशिकच्या दिशेने प्रवास करणा-या दुचाकीस्वारास अज्ञात मोटारसायकलने धडक दिल्याने सदर पुरूष जखमी झाला होता. हा अपघात गुरूवारी दुपारच्या सुमारास मनोज वाईन समोर झाला. जखमीस पोलीसानी तात्काळ जिल्हा रूग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय सुत्रांनी मृत घोषीत केले. याप्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात मृत्युची नोंद करण्यात आली असून अधिक तपास हवालदार चव्हाण करीत आहेत. तिसरा अपघात सिटी सेंटर भागात झाला. भरधाव दुचाकी दुभाजकावर आदळल्याने मिलींद उत्तमराव मुळाणे (४४ रा.शारदा सोसा.जुना गंगापूर नाका) हे ठार झाले. मुळाणे गुरूवारी सिडको कडून आपल्या दुचाकीवर घराकडे जात असतांना हा अपघात झाला. काठीयावाड दुकानासमोर भरधाव दुचाकी दुभाजकावर आदळल्याने ते गंभीर जखमी झाले होते. त्यांना तात्काळ जिल्हा रूग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय सुत्रांनी मृत घोषीत केले. याप्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात मृत्युची नोंद करण्यात आली असून अधिक तपास हवालदार कटारे करीत आहेत. तर गंगापूररोडवर कारच्या धडकेत दुकाचीस्वार मित्र जखमी झाले. याप्रकरणी जगन देवराम मोकाशी (रा.नाचलोंढी ता. पेठ) या युवकाने तक्रार दाखल केली आहे. मोकाशी व पंकज बागड हे दोघे मित्र गुरूवारी गंगापूर गावाकडून नाशिकच्या दिशेने आपल्या दुचाकीवर (एमएच १५ जीझेड ७९४८) प्रवास करीत असतांना हा अपघात झाला. कवडे गार्डन समोर भरधाव येणा-या एमएच १५ एचजी ९९९८ या कारने दुचाकीस धडक दिल्याने दोघे मित्र जखमी झाले. या अपघातात मोकाशी यांचा पाय मोडला असून अधिक तपास पोलीस नाईक भर्डींगे करीत आहेत.