मुंबई – ‘बेलबॉटम’ या अभिनेता अक्षय कुमारच्या चित्रपटासाठी अडचणी वाढू शकतात. या चित्रपटाच्या कास्टिंग दिग्दर्शकाने त्याच्या एका मित्रासोबत एका अभिनेत्रीचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप असून याप्रकरणी तक्रार दाखल करण्यात आली आहे. पिडीत अभिनेत्रीच तक्रार नोंदवण्यासाठी वर्सोवा पोलीस ठाण्यात गेली होती. या कास्टिंग दिग्दर्शकाचे नाव आयुष तिवारी आहे, तर या कुकर्मात त्याला साथ देणाऱ्या त्याच्या मित्राचे नाव राकेश शर्मा आहे. पीडितेने अनेक चित्रपट तसेच ओटीटी प्लॅटफॉर्मवरील वेबसिरीजमध्ये काम केले आहे.
पोलिसांत दाखल तक्रारीनुसार, कास्टिंग दिग्दर्शकाने तिला लग्नाचे आमिष दाखवून तिच्याशी अनैसर्गिक संबंध ठेवले. तिने जेंव्हा लग्नासाठी दबाव आणला, तेंव्हा त्याने आधीच रेकॉर्ड केलेले त्यांचे व्हिडीओ आणि फोटो इंटरनेटवर टाकण्याची धमकी दिली. या भीतीमुळेच आतापर्यन्त ही अभिनेत्री पोलिसात गेली नव्हती. तक्रारीनुसार, पीडितेला ब्लॅकमेल करून तिवारीने तिच्यासोबत अनैसर्गिक शारीरिक संबंध ठेवले. तिने जेव्हा या गोष्टीची कल्पना त्याच्या मित्राला, राकेश शर्मा याला दिली, तेव्हा त्यानेही सहानुभूती दाखवण्याच्या नावाखाली तिच्याशी संबंध प्रस्थापित केले. अशी माहिती पीडितेने पोलिसांना दिली आहे.