नाशिक – कोरोनाच्या संकटामुळे अनेकांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली आहे. त्यामुळे बुरट्या चोऱ्या वाढल्याचे दिसून येत आहे. अंबड औद्योगिक वसाहतीत एका कंपनीतून रोकड व मोबाईल लांबवल्याची घटना घडली आहे. कारखान्यातील कार्यालयात शिरून चोरट्यांनी रोकडसह मोबाईल चोरून नेला. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जिगनेस रतीलाल कारीया (रा. सावरकरनगर, गंगापूररोड) यांनी या प्रकरणी तक्रार दाखल केली आहे. कारीया यांचे अंबड औद्योगिक वसाहतीत संगिता सिमेंट प्रॉडक्ट नावाचा कारखाना आहे. या कारखान्याच्या आवारातच त्यांचे कार्यालय आहे. गुरुवारी (दि. २४) रात्री अज्ञात चोरट्यांनी बंद कार्यालयाच्या खिडकीचे गज वाकवून कॅबीनमधील टेबलाच्या ड्रॉव्हरमधून सुमारे बारा हजाराची रोकड आणि मोबाईल असा सुमारे २७ हजाराचा ऐवज चोरून नेला. अधिक तपास जमादार शेळके करीत आहेत.
कोरोना महामारीमुळे बेरोजगारी वाढली आहे. अर्थव्यवस्था पुन्हा रुळावर आली नाही तर प्रश्न अधिक गंभीर होणार आहे. गेल्या काही दिवसात किरकोळ चोरीच्या घटना वाढत आहेत. हे संकेत चांगले नाहीत. याची योग्य ती दखल संबंधितांनी घ्यायला हवी.
धनंजय बेळे, माजी अध्यक्ष, निमा
—
दाम्पत्याकडून दोघा भावांना मारहाण
नाशिक – किरकोळ कारणातून दांम्पत्याने एकावर चाकू हल्ला करीत दोघा भावांना बेदम मारहाण केल्याची घटना जुने नाशिक भागातील खैरे गल्लीत घडली. याप्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कैलास पिसे आणि सपिता पिसे (रा.आसावरची वेस) असे मारहाण करणाºया दांम्पत्याचे नाव आहे. याप्रकरणी किरण भरत पाटील (रा.आसावरची वेस) यांनी तक्रार दाखल केली आहे. संशयीत आणि तक्रारदार एकाच भागात राहणारे असून, शुक्रवारी (दि.२५) दुपारच्या सुमारास हा वाद झाला. मोदकेश्वर मंदिराजवळ संशयीतांनी पाटील यांच्यासह त्यांचा भाऊ भुषण पाटील यांच्याशी किरकोळ कारणातून वाद घातला. यावेळी संतप्त दांम्पत्याने शिवीगाळ करीत दोघा भावांना लाथाबुक्यांनी मारहाण केली तर कैलास पिसे याने किरण पाटील यांच्यावर चाकू हल्ला केला. अधिक तपास पोलीस नाईक लभडे करीत आहेत.