नाशिक – महाविकास आघाडीतर्फे मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेअंतर्गत ‘बेरोजगारांसाठी स्वयं रोजगार संधी’ उपलब्ध करून देण्यात आली आहे. २६ ऑगस्ट पासून या योजनेचा श्रीगणेशा होणार आहे. याअंतर्गत बेरोजगार वर्गासाठी रोजगाराच्या नवनवीन संधी उपलब्ध होणार आहेत. पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण योजना कार्यान्वित होणार आहे. मुंबई नाका येथील राष्ट्रवादी भवन कार्यालयात अर्ज वितरण सुरु होणार आहे.
कोरोना महामारीच्या काळात सर्वसामान्य जनतेला आर्थिक पाठबळ देण्याच्या प्रयत्न याद्वारे होणार आहे. याअंतर्गत टेम्पो खरेदीसाठी १५ ते २५ टक्के सबसिडी लाभार्थीना मिळणार आहे. तसेच ९० ते ९५ टक्के कर्ज मिळकतीची मदत केली जाणार आहे. त्याचप्रमाणे नव्याने लहानसा व्यवसाय सुरु करण्याच्या प्रयत्नात असलेल्या तरुणांना याचा फायदा होणार आहे. फळभाज्या तसेच आयात निर्यातीसाठी आर्थिक मदत दिली जाणार आहे. हॉटेल्स व्यवसायाकडे लक्ष असलेल्या नवोदित तरुणांना यामाध्यमातून आर्थिक मदत दिली जाणार आहे. त्याच प्रमाणे फिरते विक्री केंद्र उभारणीकडे प्रामुख्याने लक्ष दिले जाणार असून याद्वारे आर्थिक पाठबळ देण्याचा प्रयत्न या योजनेतून केला जाणार आहे. संबंधित योजनेसाठी अर्ज वितरणाची प्रक्रिया उद्यापासून सुरु होत असून २० सप्टेंबर पर्यंत अर्ज भरण्यासाठी मुदत देण्यात आली आहे. अधिक माहितीसाठी ९००४१६२८२४, ९००४१७६१३४ येथे संपर्क साधावा. जास्तीत जास्त जणांनी योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे.