कानपूर – बेपत्ता झालेल्या मुलीचा शोध घेण्यासाठी दिव्यांग वृद्धेकडे त्यांनी पैसे मागितले. वाहनात डिझेल भरण्यासाठी हवेत, असेही सांगितले. पोटचा गोळा सापडावा म्हणून त्या वृद्धेने भीक मागून पै पै गोळा केली. जमा झालेले पैसे पोलिसांना दिले. ही बाब कळताच या दोन्ही पोलिसांचे तातडीने निलंबन झाले आहे.
प्राथमिक तपासात दोषी आढळल्याने जिल्हा पोलीस प्रमुखांनी ही कारवाई केली असून त्याचबरोबर पोलिसांनी चार संशयितांना ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली आहे. सनिगवान येथील रहिवाशी असलेली किशोरवयीन मुलगी ७ जानेवारीला बेपत्ता झाली. या प्रकरणी वृद्ध महिलेने आपल्या मुलीचे अपहरण झाल्याचा अहवाल दिला. यात संशयित म्हणून पाच ओळखीच्या व्यक्ती आणि दोन अज्ञात अशी नावे देण्यात आली.
या मुलीचा शोध घेण्यासाठी पोलीस चौकी प्रभारी राजपाल सिंह आणि अरुण कुमार यांनी आपल्या गाडीमध्ये डिझेल भरण्याच्या नावाखाली १२ हजार रुपये वसूल केल्याचा आरोप या महिलेने केला आहे. पैसे दिल्यानंतरही दोघांनी आपल्या मुलीचा शोध घेतला नाही. तसेच भीक मागून त्यांना आपण पैसे दिले, असेही या माहिलेने वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना सांगितले. त्यानंतर डीआयजी डॉ. प्रितिंदर सिंग यांच्या आदेशावरून तपास चक्रे फिरविण्यात आली. तपासात सदर आरोप खरे असल्याचे समजल्यानंतर डीआयजीने दोन्ही पोलिसांना निलंबित केले. हे प्रकरण माध्यमांसमोर आल्यानंतर पोलिसांनी चार जणांना ताब्यात घेतले आहे.