नाशिक – शहरातील कोरोनाचा प्रादुर्भाव प्रचंड वाढत असतानाच महापालिकेचा कारभारही चव्हाट्यावर आला आहे. ऑक्सिजन बेड मिळत नसल्याने दोन कोरोना बाधित रुग्णांनी थेट महापालिकेचे मुख्यालयच गाठले. ऑक्सिजन सिलेंडर आणि कोरोनाचा रिपोर्ट घेऊनच या दोन कोरोना बाधित रुग्णांनी गांधीगिरी आंदोलन केले. यापूर्वीही अनेकांनी तक्रार केली आहे की बेड मिळत नाही. मात्र, ती बाब फारशी गांभिर्याने घेण्यात आलेली नाही. या दोन रुग्णांनी आंदोलन करताच महापालिकेची रुग्णवाहिका तातडीने या दोन रुग्णांना घेण्यास आली. तातडीने या रुग्णांना ऑक्सिजन बेड उपलब्ध करुन देण्यात आला आहे. दरम्यान, कोरोना बाधितांच्या या गांधीगिरी आंदोलनामुळे महापालिकेच्या वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.
ज्या रुग्णांना बेड मिळत नाहीत त्यांनी थेट आता महापालिका मुख्यालय गाठावे म्हणजे त्यांनाही बेड मिळेल आणि विशेष म्हणजे महापालिकेची रुग्णवाहिकाही आपल्याला घ्यायला येईल, असा संदेश आजच्या घटनेतून गेल्याचे अनेकांनी म्हटले आहे. महापालिकेच्या कारभारावर विरोधकांनी पुन्हा टीका सुरू केली असून कोरोनाचे आव्हान सत्ताधाऱ्यांना पेलवत नसल्याचा टोलाही त्यांनी लगावला आहे.
दरम्यान, शहरातील परिस्थिती गंभीर असून सर्वसामान्यांना बेड मिळण्यासाठी महापालिकेने हेल्पलाईन सुरू केली असली तरी ती कुचकामी ठरत असल्याचे आजच्या प्रसंगावरुन दिसत आहे.