बेंगळुरु – येथील पाच हॉकी खेळाडू ७ ऑगस्ट रोजी केलेल्या चाचणीत पॉझिटीव्ह आढळून आले होते, आता त्यांची प्रकृती उत्तम आहे. भारतीय क्रीडा प्राधिकरणाचे डॉक्टर आणि राज्य सरकारने नियुक्त केलेले एक डॉक्टर त्यांच्यावर उपचार करत आहेत. तसेच मणिपाल रुग्णालयांच्या तज्ज्ञ डॉक्टरांचेही या खेळांडूवर लक्ष आहे. राज्य सरकारने नियुक्त केलेले डॉक्टर अविनाश एच. आर यांनी सांगितले की, “पाचही खेळाडूंचे तापमान, ऑक्सिजन पातळी नियमितपणे तपासली जात आहे, सर्वांमध्ये सौम्य लक्षणे दिसून आली आहेत. पाचपैकी एकालाच ताप आहे. आम्ही त्यांना रोगप्रतिकारक शक्ती आणि इतर पूरक औषधे देत आहोत. त्यांची प्रकृती बरी होईपर्यंत नियमांनूसार नियमित तपासणी केली जाईल. या पाच खेळाडूंच्या देखरेखीसाठी एसएआयने दोन अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे. भारतीय हॉकी संघाचे प्रशिक्षक ग्रॅहम रीड म्हणाले की, “आपण या पाच खेळाडूंच्या नियमित संपर्कात असून, त्यांची प्रकृती सध्या उत्तम आहे. एसएआय त्यांची उत्तम काळजी घेत आहे. नियमित भोजनाव्यतिरिक्त या खेळाडूंच्या आवडीच्या भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे. खेळाडू यामुळे आनंदी आहेत.”