नाशिक – बॅग लिफ्टींग करणारी आंतरराज्यीय टोळीला जेरबंद करण्यात नाशिक पोलिसांना यश आले आहे. दिल्लीतील या टोळीला मध्यप्रदेशातील इंदूर येथे ताब्यात घेण्यात आले आहे. या टोळीकडून इनोव्हा कारसह रोख पैसे असा सुमारे १० लाख ८६ हजार रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई शहर गुन्हे शाखेच्या युनिट १ च्या पथकाने केली. यासंदर्भात पोलिस उपायुक्त संग्रामसिंग ठाणेदार यांनी माहिती दिली आहे.
हे आहेत टोळीतील साथीदार
कांगत्रम सैल्ली दुराई,पवन मोहन लाल,आकाश मोहन लाल,मनतोश अली मुत्तू,मरियप्पा काली बाबु,विनोद राजेंद्र,साहिल सुरेश व त्यांचा अल्पवयीन साथीदार (रा.सर्व दिल्ली) अशी संशयीतांची नावे आहेत.
नाशकातील घटनेने सुरू झाला तपास
रामचंद्र नामदेव जाधव (रा.बोधलेनगर,ना.रोड) यांनी तक्रार दाखल केली होती. जाधव बुधवारी (दि. ५ आॅक्टो.) आपल्या चारचाकी वाहनातून महात्मा गांधीरोड भागात आले होते. यावेळी ते कारमध्ये बसलेले असतांना एकाने त्यांना गाडीचे ऑईल पडत असल्याचे सांगितले मात्र जाधव यांनी त्याकडे कानाडोळा केला. परंतू काही वेळातच दुसºया व्यक्तीनेही गाडीचे ऑईल लिक होत असल्याचे सांगितल्याने जाधव आपल्या कारखाली उतरले असता ही घटना घडली होती. अज्ञात चोरट्यांनी चालकाच्या आसनापाठीमागील सिटावर ठेवलेल्या दोन बॅगा हातोहात लांबविल्या होत्या. त्यातील एका बॅगेत एक लाख रूपयांची रोकड होती. ही बाब लक्षात येताच जाधव यांनी सरकारवाडा पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली होती.
असा केला तपास
सरकारवाडा पोलीस आणि युनिट १ चे पथक संयुक्त तपास करीत असतांना युनिटचे निरीक्षक आनंदा वाघ व सहाय्यक निरीक्षक महेश कुलकर्णी यांना मिळालेल्या माहितीवरून ही कारवाई करण्यात आली. संशयीत दिल्ली येथील रहिवाशी असल्याची माहिती पोलीसांना मिळाली होती. त्यानुसार पोलीस संशयीतांच्या मागावर असतांना रविवारी (दि.१) ही टोळी मध्यप्रदेश येथील इंदूर शहरात रवाना झाल्याचे कळले. त्यानुसार निरीक्षक वाघ यांनी सहाय्यक निरीक्षक कुलकर्णी,रघुनाथ शेगर हवालदार येवाजी महाले,विशाल देवरे शिपाई गणेश वडजे आदींचे पथक इंदोर येथे रवाना केले. पथकाने इंदोर शहरातील हॉटेल आणि लॉजींग पिंजून काढले मात्र संशयीत हाती लागले नाही. परतीच्या प्रवासापुर्वी पोलीसांनी बंजारी ता.प्रिथमपुर या गावाकडे आपला मोर्चा वळविला असता संशयीत पोलीसांच्या हाती लागले. द ग्रीन अॅपल या हॉटेल जवळून पोलीस फेरफटका मारत असतांना संशयीतांची इनोव्हा (एचआर २६ बीआर ९०४४) पोलीसांच्या नजरेत भरली. पथकाने तात्काळ कार अडवून संशयीतांना बेड्या ठोकल्या.
गुन्ह्याची कबुली
पोलीस तपासात त्यांनी गुह्याची कबुली दिली असून त्यांच्या ताब्यातून गुह्यात वापरलेली इनोव्हा,सात मोबाईल,मिरची लिक्वीड,गलोर,छर्ररे,आणि ७० हजाराची रोकड असा १० हजार ८६ हजाराचा ऐवज जप्त केला. पोलीस तपासात संशयीतांनी महाराष्ट्र,गुजरात,राजस्थान आणि दिल्लीत अश्या प्रकारचे गुन्हे केले असून लॉकडाऊन अनलॉक होताच पुणे, मुंबई,ठाणे,इंदोर,सुरत आणि अहमदाबाद मध्येही असे गुन्हे केल्याची कबुली दिली आहे. या गुह्याचा तपास सहाय्यक निरीक्षक रघुनाथ शेगर करीत असून संशयीतांना न्यायालयाने सोमवार (दि.९) पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.