व्हायरल व्हायरोलोजिस्ट
चायनीज व्हायरोलोजिस्ट डॉ. लि मेंग यान ही महिला जगाच्या आरोग्य क्षेत्रात
व्हिसल ब्लोअर म्हणून प्रसिद्ध आहे. त्यांनी नुकत्याच केलेल्या काही विधानांनी जगभरात खळबळ उडाली आहे. त्यावर टाकलेला हा फोकस…
– डॉ. स्वप्नील तोरणे
( लेखक जनसंवाद अभ्यासक आहेत)
डॉ. लि मेंग यान
एम डी. विषाणू संक्रमण या विषयातील पिएचडी.
चायनीज व्हायरोलोजिस्ट..
मागील वर्षी एवढीच ओळख असलेल्या डॉ. लि आता जगभरात आरोग्य क्षेत्रात व्हिसल ब्लोअर म्हणून प्रसिद्ध झाल्या आहेत. त्यांच्या विधानांनी जगभरात खळबळ उडाली आहे. त्यांनी जगभरातल्या प्रसारमाध्यमांना दिलेल्या ऑनलाईन मुलाखती सर्वच सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वर प्रचंड व्हायरल झाल्या आहेत.
“मी एक डॉक्टर आहे. आणि एक सायंटिस्ट देखील. जे घडले आहे ते मला समजत गेले. त्यात जसे जसे अधिक संशोधन करीत गेले तसे तसे त्यातील विदारक सत्य उमगत गेले. जे समजते आहे ते जगासमोर आणणे माझे कर्तव्य आहे. माझे आयुष्य, माझ्या जवळच्या लोकांचे जीवन धोक्यात आहे. परंतु जगात पसरणाऱ्या धोकादायक विषाणूबाबत मूलभूत माहिती असणे आवश्यक आहे. हा प्रश्न विश्वातील मानवी आरोग्याशी संबंधित असल्याने मी गप्प बसू शकत नाही..” हे विधान डॉ. लि मेंग यांचे आहे. त्या व्हायरोलॉजिस्ट मूळचे चायनीज आहेत. ग्वांगझुलू येथील मिलिटरी मेडिकल युनिव्हर्सिटी म्हणून प्रसिद्ध असलेल्या सदर्न मेडिकल युनिव्हर्सिटी येथे डॉक्टर ली यांनी पीएचडी केली आहे. तर वुहान येथील सेंट्रल साउथ मेडिकल यूनिव्हर्सिटी अंतर्गत मेडिकल कॉलेज येथून एम डी ही पदव्युत्तर पदवी संपादन केली आहे.
वेगवेगळ्या आंतरराष्ट्रीय माध्यमांना दिलेल्या आपल्या मुलाखतीमध्ये डॉ. ली सांगतात की, डिसेंबर १९ च्या सुमारास हाँगकाँग युनिव्हर्सिटीच्या अंतर्गत असलेल्या वर्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या रेफरन्स लॅबोरेटरी मध्ये वुहान येथील सार्स सदृश्य साथीच्या रोगावर त्यांनी संशोधन करायला सुरुवात केली होती. वर्षाच्या अखेरीपर्यंत जे संशोधन करण्यात आले त्याची मी सातत्याने माझ्या वरिष्ठांना माहिती देत होते. त्यावेळेस जर माझ्या संशोधनाची दखल घेतली गेली असती तर अनेकांचे प्राण वाचू शकले असते, असा दावा त्यांनी केला आहे. मात्र माझे काहीच ऐकले गेले नाही, या उलट माझ्यावर गप्प राहण्याबाबत दबाव आणला गेला. तरीदेखील मी माझे कामकाज गुप्त पद्धतीने सुरूच ठेवले. या क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्तींना एकत्र करून त्यावर काम करीत राहिले. मात्र माझ्यावर दबाव वाढत असल्याने अखेरीस हॉंगकॉंग वरून अमेरिकेमध्ये जावे लागले, असे त्या सांगतात.
डॉ. लि मेंग यांनी एप्रिल अखेरीस अमेरिकेत अज्ञात स्थळी आसरा घेतला. त्यानंतर विविध जागतिक माध्यमांना मुलाखती देऊन त्यांनी चीन सरकारवर गंभीर आरोप करायला सुरुवात केली. नुकताच १४ सप्टेंबरला आपल्या दाव्याचा पुनरुच्चार करून त्यांनी जगभर खळबळ उडवून दिली आहे. जगभरात मृत्यूचे थैमान घालणाऱ्या कोरोनाचा विषाणू हा वटवाघळाकडून नैसर्गिकरीत्या मानवाकडे संक्रमित झाला. हा चिनी शास्त्रज्ञांचा दावा खोटा आहे, असे डॉ. यान सांगतात. त्या म्हणतात की, हा विषाणू चिनी सरकारच्या नियंत्रणाखाली असलेल्या वुहान मधील प्रयोगशाळेत निर्माण झाला आहे. कोरोना विषाणूची उत्पत्ती मांस बाजारातून झालेले असल्याचे खोटे वृत्त सर्वत्र पसरविण्यात आले, असा दावा या विषाणू तज्ज्ञांनी केला आहे. आपल्या विधानाचे समर्थन करताना डॉ. यान म्हणतात की, कोरोना विषाणूचा जिनोम सिक्वेन्स हा मानवी फिंगरप्रिंट सारखा आहे. याच आधारावर हा विषाणू प्रयोगशाळेत तयार करण्यात आलेला आहे. कोणत्याही विषाणू मध्ये मानवी बोटांच्या प्रतिकृतीची उपस्थिती हे सांगण्यास पुरेशी आहे की तो मानवनिर्मित आहे.
नव्या वर्षाच्या सुरुवातीस जानेवारीपासून कोविड विषाणूचे जगभर संक्रमण सुरू झाले. मार्च-एप्रिलमध्ये युरोपच्या इटली, फ्रान्स सारख्या देशांमध्ये या महामारीचे खरे स्वरुप जगासमोर यायला सुरुवात झाली. अगदी प्रारंभापासून चीनमुळेच या विषाणूचा फैलाव साऱ्या जगभर झाला. याबाबत सगळ्या देशांचे एकमत होते. चीन सरकारतर्फे वेळोवेळी याबद्दल खंडन केले गेले असले तरीही त्यांच्यामार्फत वेगवेगळ्या पद्धतीचे वक्तव्य संदिग्धता निर्माण करणारेच होते. चीनने जैविक युद्ध छेडल्याचा गंभीर आरोप अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केला आहे. हे आरोप चीन सरकारने फेटाळून टाकले.
अमेरिकेतील राष्ट्राध्यक्षपदाची होऊ घातलेली निवडणूक आणि चीन-अमेरिकेतील अनेक वर्षांपासून सुरू असलेले शीतयुद्ध यामुळे ठोस शास्त्रीय आधार नसल्याने असली वक्तव्यं केवळ राजकीयच ठरली. आरोप-प्रत्यारोपांच्या कोलाहात मात्र चीनी असलेल्या आणि त्यातही विषाणू तज्ज्ञ असलेल्या डॉ. लि मेंग यान यांनी केलेल्या दाव्यांनी चीन सरकारच्या एकूणच कार्यप्रणालीवर संशयाची सुई घट्ट होत आहे.
वुहानच्या मासळी बाजारातील विक्रेत्यांना या रोगाची लागण झाली. डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात तीन रुग्णांना दाखल करून उपचार सुरू झाले. त्यातील २४ रुग्ण हे याच बाजारात विक्रेता म्हणून काम करीत होते, असे चीन सरकारचे शास्त्रज्ञ सांगतात. डॉ. यान याला सरळ सरळ स्मोक स्क्रीन असे म्हणतात. सत्य झाकण्यासाठी समोर उभी केलेली धुराची भिंत काहीही पाहू शकत नाही, असा या वक्तव्याचा अर्थ होतो.
जेव्हा डॉ. यान यांना प्रश्न विचारले गेले की, सध्याचे दिवस हे विषाणूच्या उत्पत्ती शोधण्यापेक्षा त्याच्यावर नियंत्रण साधण्याचे आहे. त्यावर ते म्हणतात, जो पर्यंत विषाणूच्या निर्मिती मागील सत्य उमगत नाही, तोपर्यंत त्यावर मात करण्यासाठी प्रयत्न कसे होतील. त्यासाठीच विषाणूचा जन्म शोधला पाहिजे म्हणजे तो नष्ट करता येईल.
प्रचंड लोकसंख्या असलेला देश असतानाही चीन मधल्या या विषाणू प्रसारावर आश्चर्यकारक नियंत्रण, या परिस्थितीत देखील युरोप, अमेरिकेत चीनी कंपन्यांनी मोठ्या प्रमाणावर व्यापार उद्योग क्षेत्रात हात पाय पसरवण्याचे केलेले प्रयत्न, संपूर्ण जग भीषण आर्थिक मंदीत लोटला जात असताना चीनचे अनावश्यक सीमावाद निर्माण करण्याचे प्रयत्न.. या सगळ्या गोष्टींमधून चित्र स्पष्ट आहेच. प्रतिक्षा फक्त रिसर्च मेथॉडॉलोजीच्या माध्यमातून डॉ. लि मेंग यान यांच्या विधानांवर पुराव्यासह सत्य बाहेर येण्याची.
(लेखकाशी संपर्क – मो. ९८८१७३४८३८ ई मेल – swapniltorne@gmail.com)
Best article… Tis information cud have saved d world, if it comes earlier????
खूप संतुलित आणि शास्त्रोक्त विधान