विश्वव्यापी घोडदौड
भारताचे किंबहुना संपूर्ण जगाचे लसींच्या निर्मितीतील वॅक्सिन किंग म्हणून ओळखले जाणारे डॉक्टर सायरस पूनावाला हे भारतातील प्रथम क्रमांकाची बायोटेक कंपनी सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे अध्यक्ष आहेत. सिरम इन्स्टिट्यूट १७० पेक्षा जास्त देशांमध्ये आपल्या लसी पोहोचवते. जगातील प्रत्येक दोन मुलांपैकी एकास दिली जाणारी लस ही सिरमचीच असते. हा उद्योग उभारणारे डॉ. सायरस पुनावाला यांचा आजवरचा प्रवास अत्यंत विलक्षण आहे.
डॉ. स्वप्निल तोरणे
(लेखक जनसंवाद अभ्यासक आणि महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे जनसंपर्क अधिकारी आहेत)
घोड्यांच्या ब्रिडींग स्टड फार्म पासून सुरू झालेल्या व्यवसायाची दिशा बदलून एका वेगळ्याच उद्योगाची पायाभरणी एका तरुणाने केली. काहीतरी वेगळे करून दाखवण्याची जिद्द आणि प्रचंड आत्मविश्वास वाणिज्य शाखेच्या पदवीधर असलेल्या त्या युवकाच्या व्यक्तिमत्त्वात ओतप्रोत भरलेला होता. असे काहीच नव्हते की त्या तरुणाला आपल्या वडिलांनी सुरू केलेला घोड्यांच्या ब्रिडींगचा व्यवसाय आवडत नव्हता. उलट त्याला घोड्यांविषयी विशेष ममत्व होते. यातूनच आपण काही भव्य, लोकांना उपयुक्त ठरणारे काम करावे असे योजून त्या तरुणाने नव्या उद्योगाची मुहूर्तमेढ रोवली.
भारताचे किंबहुना संपूर्ण जगाचे लसींच्या निर्मितीतील वॅक्सिन किंग म्हणून ओळखले जाणारे डॉ. सायरस पूनावाला हे भारतातील प्रथम क्रमांकाची बायोटेक कंपनी सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे अध्यक्ष आहेत. सिरम इन्स्टिट्यूट १७० पेक्षा जास्त देशांमध्ये आपल्या लसी पोहोचवते. जगातील प्रत्येक दोन मुलांपैकी एकास दिली जाणारी लस ही सिरमचीच असते. सिरम इन्स्टिट्यूट चा दावा आहे की, जगातील पासष्ट टक्के लहान मुलांना आमची लस दिली जाते. १७० पेक्षा अधिक देशांमध्ये रेबीज, गोवर, गालगुंड, रूबेला, डांग्या खोकला, टिटॅनस, घटसर्प, क्षयरोग, रोटा व्हायरस आणि हिपॅटायटिस-बी जीवरक्षक प्रतिबंधक लसींचे दीड अब्जपेक्षा जास्त डोस सिरम तर्फे पुरवले जातात. फोर्ब्स मॅगझिन जून २०२० च्या क्रमवारीत सायरस हे भारतातील सातव्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती आहेत.
पुण्याच्या बिशप स्कूल मधून त्यांचे शालेय शिक्षण झाले. तर बृहन महाराष्ट्र वाणिज्य महाविद्यालयातून त्यांनी पदवीचे शिक्षण घेतले. सायरस यांनी शिक्षणानंतर घोड्यांच्या ब्रीडिंगचा व्यवसाय पाहू लागले, मात्र त्यांना त्याहूनही अधिक काहीतरी व्यापक असे काम करायचे होते. यातुनच १९६६ साली सिरम इन्स्टिट्यूटची स्थापना झाली. काही तंत्रज्ञ आणि डॉक्टरांच्या मदतीने सुरू झालेला हा उद्योग आज जगातील सर्वाधिक मोठा वॅक्सिन मॅन्युफॅक्चरर आहे. कमी खर्चात परवडणारी लस असेल तरच ती जगभरातील लहान मुलांपर्यंत पोहोचू शकेल, या विचारसरणीवर सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया स्वस्त आणि परवडणाऱ्या दरात लस जगभरात पोहोचवते. पुण्यात हेड ऑफिस असलेल्या या उद्योग समूहाचे आज अनेक विविध देशात मॅन्युफॅक्चरिंग युनिट आहे.
पूनावाला ग्रुपचे बायोटेक व्यतिरिक्त अनेक व्यवसाय आहे. त्यामध्ये प्रामुख्याने बीथोवेन बायोलॉजिकल, पूनावाला एव्हिएशन, पूनावाला फायनान्स, क्लीन एनर्जी, हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्री असे वेगवेगळे उद्योग आहेत. सायरस यांच्या पत्नीचे निधन झाल्यानंतर विलू पूनावाला यांच्या नावे या समुहातर्फे समाजपयोगी कार्यासाठी फाऊंडेशन स्थापन करण्यात आले आहे.
सायरस हे घोड्यांच्या रेस समवेत अनेक महागड्या कार्स चा ताफा बाळगून आहेत. काही वर्षांपूर्वी दक्षिण मुंबई मधील लिंकन हाऊस या घराच्या खरेदीसाठी साडेसातशे कोटी रुपये मोजल्याची चर्चा सर्वत्र झाल्याने केवळ इलाईट क्लास मध्ये चर्चेत असलेले सायरस प्रसिद्धीच्या झोतात आले. मात्र सायरस हे उगाच असंख्य कार्यक्रम करीत नाही, प्रसिद्धी पासून काहीसे परांगमुख असा त्यांचा स्वभाव आहे.
सायरस पूनावाला यांना त्यांच्या कामगिरीबद्दल आजवर अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. दुबईमध्ये ‘एशियन बिझनेस लीडरशिप फोरम’तर्फे जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे; ऑक्सफर्ड विद्यापीठातर्फे प्रतिष्ठेची ‘डॉक्टर ऑफ सायन्स ऑनरिस कौसा’ ही मानद पदवी प्रदान करण्यात आली आहे. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठातर्फे डॉक्टर ऑफ लिट्रेचर, ऑनरिस कौसा’ डी लिट या पदवीने त्यांना सन्मानित करण्यात आले होते.
सध्या सिरमचा कारभार परदेशातून उच्च शिक्षण घेऊन आलेल्या आदर पूनावाला चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर या पदावरून बघत आहे. सिरम आणि पूनावाला ग्रुप जागतिक दर्जाचे मोठे काम करीत असताना सर्वसामान्य लोकांपासून तसे अपरिचितच आहेत.
सध्या सिरमचा डंका वाजयला सुरुवात झाली ती कोरोना प्रतिबंधक लस निर्मिती मध्ये त्यांनी दाखवलेल्या धडाडीमुळे. ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या सहकार्याने सीरम इन्टिट्यूट करोनाच्या लशीच्या चाचण्यांवर काम करीत आहे. सुरक्षा आणि त्याची परिणामकारकता यशस्वी झाल्यानंतरच ही लस बाजारात येऊ शकेल, अशी आमची अपेक्षा आहे असे आदर पूनावाला यांनी गेल्या महिन्यात स्पष्ट केले आहे. क्लिनिकल चाचण्या यशस्वी झाल्यास पुरेसे डोस उपलब्ध करण्यासाठी लशींचे उत्पादन करण्यात येईल. पहिल्या सहा महिन्यांसाठी सुमारे ५० लाख लशींचे उत्पादन घेण्याचे त्यांचे उद्दिष्ट आहे. त्यानंतर चाचण्यांच्या यशस्वीतेवर आम्ही दरमहा १०० कोटी डोसेसचे उत्पादन करू. हे उत्पादन भारतासह अन्य अधिकाधिक देशांमध्ये उपलब्ध करून देण्याचा आमचा प्रयत्न राहील. लस निर्मितीत सध्या आम्ही घाई करीत नसून आतापासून लस निर्मिती करताना आम्ही प्राधान्याने लशीच्या सुरक्षिततेबरोबर परिणामकारकतेवर भर देत आहोत. अशा शब्दांत सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी आदर पूनावाला यांनी लस निर्मितीबाबतची भूमिका स्पष्ट केली आहे. बिल अँड मेलिंडा गेस्ट फाऊंडेशन तर्फे या लसीसाठी विशेष आर्थिक सहकार्य करण्यात आले आहे. यामुळे ही लस स्वस्तात उपलब्ध होऊ शकेल.
सारे विश्व कोरोनाच्या विळख्यात अडकले असताना येणारी ठोस परिणामकारक आणि आर्थिक दृष्टया परवडणारी लस सर्वसामान्य जनतेला खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य आणि भयमुक्त समाज व्यवस्था पुनर्स्थापित करून देऊ शकेल.