नवी दिल्ली – येथील मंडावली भागात एका शिक्षकांचे मोठे कारस्थान उघड झाल्याने चांगलीच खळबळ उडाली आहे. कारण हा शिक्षक त्याच्याकडे शिकवणीला येणाऱ्या विद्यार्थांना मेंदू वेग वाढवण्याच्या नावाखाली त्यांना नॉर्मल स्लाइन हे इंजेक्शन देत होता.
विद्यार्थ्यांनी याबाबत याचा पालकांना सांगितल्यावर परिसरात खळबळ उडाली. त्यानंतर कुटुंबीयांच्या तक्रारीवरून पोलिसांनी संदीप माथूर या शिक्षकाला पंडित चौकातून अटक केली. त्याच्याकडून एनएसची अनेक इंजेक्शन जप्त करण्यात आली आहेत.
पोलिसांनी केलेल्या चौकशीदरम्यान संदीपने सांगितले की, त्याने युट्यूबवर पाहिले की, या इंजेक्शनमुळे मुलांचे मेंदू अधिक तलख होतात आणि त्यांची उंचीही वाढते. त्याचा इंजेक्शन देण्याचा खरा हेतू शोधण्यासाठी पोलिस प्रयत्न करीत आहे.
संदीपकडे ४० ते ५० मुले शिक्षण घेत होती. मूळचा बिहारचा रहिवासी असलेल्या संदीपने दावा केला की, गरीब मुलांनी जीवनात मोठे होण्याकरिता वाचन-लेखन केले पाहिजे, अशी त्याची इच्छा आहे. त्यामुळे त्याने स्वतः मुलांना विनामूल्य शिकवण्याचा निर्णय घेतला.
त्याच्याकडे आलेली मुले गरीब व अभ्यासात कच्ची होती. मात्र तो मुलांना इंजेक्शन देत असल्याची बातमी मिळताच परिसरात सर्वत्र अशांतता पसरली. लोकांनी संदीपला मारहाण करण्याचा प्रयत्न केला पण पोलिसांनी त्याचा बचाव केला. काही लोकांचा आरोप आहे की, तो मुलांना नशा करण्यासाठी इंजेक्शन देत होता.