नाशिक – बुद्धीबळाची मराठीभाषेतून माहिती देणारे पहिलेच अॅप बुद्धीबळपटू विनायक वाडिले याने विकसित केले आहे. चेसविकी नावाचे हे अनोखे अॅप असून त्याचा बुद्धीबळ प्रेमींना मोठा फायदा होणार आहे. नाशिकचा युवा ग्रॅंडमास्टर विदीत गुजराथी याच्या नेतृत्वाखाली भारताने बुद्धिबळ ऑलिम्पियाडमध्ये पहिल्यांदाच रशियाबरोबर सांघिक गटात सुवर्ण पदक मिळाल्याची घटना ताजी आहे. त्यातच आता नाशिकच्या बुद्धिबळ खेळाडूने तयार केलेल्या या अॅपमुळे नाशिकच्या शिरपेचात यशाचा तुरा रोवला गेला आहे.
बुद्धीबळ म्हटले की बहुतेकांना काहीतरी अवघड आहे असे वाटते, मात्र हा समज खोटा ठरवत अपच्या माध्यमातून मराठी भाषेत बुद्धीबळ समजून घेणे सोपे झाले आहे. या अॅपमध्ये बुद्धीबळ खेळाशी निगडित विविध कोडी समाविष्ट करण्यात आली आहेत. प्रश्नमंजुषेच्या माध्यमातून मुलांना बुद्धीबळाची आवड निर्माण व्हावी यासाठी प्रश्नमंजुषेची सुविधा आहे. प्रश्नांची योग्य उत्तरे दिल्यास स्पर्धकांना आकर्षक बक्षीस दिले जाते. त्याचप्रमाणे खेळाविषयी निगडित स्पर्धकांना काही शंका असल्याचे त्याचे निवारण यात केले जाते. तसेच अॅपमध्ये वेबिनार आयोजित करून तज्ज्ञ खेळाडू, ग्रँडमास्टर आणि आंतरराष्ट्रीय मास्टर मराठी भाषेमधून बुद्धिबळाचे धडे देणार आहेत. विनायकने याआधी आशिया खंडातील बुद्धिबळविषयक पहिले संकेतस्थळ तयार केले आहे. त्याच्या या यशासाठी गेल्यावर्षी नाशिक मिरची युथ आयकॉन, राष्ट्रीय यंग बिर्ला इंडियन अॅवार्ड अशा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. राज्यस्तरीय क्रीडारत्न पुरस्काराने गौरवण्यात आले.
गोडी निर्माण होईल
विद्यार्थ्यांना बुद्धीबळाची गोडी निर्माण व्हावी यासाठी हे अॅप तयार केले. यामाध्यमातून खेळाशी निगडित कोडे, प्रश्नमंजुषा समाविष्ट करण्यात आल्या आहेत. विद्यार्थ्यांच्या सर्व शंकांचे निरसन यामाध्यमातून होणार आहे. मराठी भाषेत बुद्धीबळ शिकवले जाणारे पहिले अॅप असल्याने केलेल्या कामाचे समाधान आहे. स्पर्धकांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळतो आहे.
विनायक वाडिले , अप निर्माता