मुंबई – कमी किमतीत लक्झरी गाड्या खरेदी करण्याची आपली इच्छा असेल तर एक उत्तम संधी चालून आली आहे. एका संकेतस्थळाने दिलेल्या माहितीनुसार बीएमडब्ल्यू ग्रुप इंडियाने दोन दिवसांचा लिलाव आयोजित केला आहे. या आॅनलाइन लिलावात सहभाग घेऊन या कंपनीच्या ५४ कार आणि बाइक्स कमी किमतीत खरेदी करता येणार आहे. मात्र, हा लिलाव असल्यामुळे जास्त पैसा खर्च करूनही गाडी खरेदी करण्याची वेळ येऊ शकते.
ज्या ग्राहकांना या आॅनलाइन लिलावात भाग घ्यायचा आहे त्यांना सुरुवातीवा पाच हजार रुपये नोंदणी शुल्क भरावे लागणार आहे. गाडी खरेदी केली अथवा नाही, तरीही हे पैसे परत मिळणार नाही, असे कंपनीने स्पष्ट केले आहे. यातील बहुतांश गाड्या सेकंडहँड आहेत. सोबतच काही कार अशाही आहेत ज्या आतापर्यंत रजिस्टर झालेल्या नाहीत. अशात जो सर्वांत जास्त किंमत देईल तोच त्या गाडीचा पहिला मालक असेल. यामध्ये एकूण ५४ गाड्या आहेत. BMW X4 M, BMW Z4 40i, BMW X6, BMW M2 आणि BMW M5 सारख्या गाड्यांचा यात समावेश आहे. तर BMW G 310 R, BMW G 310 GS, आणि BMW F 750 GS सारख्या बाइक्सही सामील आहेत. या लिलावाचे वैशिष्ट्य हेच आहे की देशाच्या कुठल्याही कोपऱ्यात बसून तुम्ही बीएमडब्ल्यू गाड्या खरेदी करू शकणार आहात.
१,७० लाखापासून सुरुवात
या लिलावात सर्वांत कमी किंमत BMW G 310 R या बाइकची ठेवण्यात आली आहे. २०१८ मध्ये लॉन्च झालेली आणि ५५५३ किलोमीटर धावलेल्या या गाडीची किंमत १.७० लाख रुपये आहे. तसेच २५२४ किलोमीटर धावलेली Mini Countryman Cooper S कारची किंमत २७ लाख रुपये ठेवण्यात आली आहे. तर Mini Cooper S Clubman ची किंमत ३१.५० लाख रुपये निश्चित करण्यात आली आहे.