पाटणा – बिहारच्या निवडणुकीत चौथ्यांदा विजयी झालेल्या एका आमदाराने सध्या सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे. त्यामुळेच संपूर्ण देशभरात त्यांची चर्चा होत आहे. त्याचे कारण हे आहे की, ते यापूर्वी तीन वेळा आमदार राहिले असले तरी त्यांचे अद्याप स्वतःचे घर नाही. त्यांचे उत्पन्न शून्य आहे.
भारतीय राजकारणाचा इतिहास आणि सध्याची स्थिती पाहता आपल्याला असे दिसून येते की, सध्याच्या काळात बहुतेक वेळा जेव्हा एखादी व्यक्ती कोणत्याही पदासाठी निवडणूक लढवते तेव्हा त्याच्याकडे पैशाचा साठा असतो. किंवा निवडणूक जिंकल्यावर तरी तो नक्कीच मालामाल होतो. परंतु आजही असे काही लोक आहेत जे प्रामाणिकपणावर उभे राहून लोकप्रतिनिधी असल्याचे मानतात आणि लोकांची सेवा करतात. मात्र धनदौलत जमा करण्याच्या मागे लागत नाहीत.
सध्याचे त्यातील एक उदाहरण म्हणजे भाकपचे आमदार मेहबूब आलम (वय 44 ) हे होत . ते दहावी पास असून शेतकरी आहेत , निवडणूक आयोगाला दिलेल्या प्रतिज्ञापत्रात त्याचे उत्पन्न शून्य आहे, त्यामुळे ते इतरांपेक्षा वेगळे नेते ठरतात. बिहार निवडणुकीत सर्वाधिक मतांनी विजयी झालेले आमदार मेहबूब आलम हे बिहारमधील कटिहार जिल्ह्यातील बलरामपूर मतदारसंघातून चौथ्यांदा निवडून गेले आहेत, पण त्यांच्या कडे आजपर्यंत स्वतःचे पक्के घर नाही. त्यांच्याकडे वाहन नसल्याने आजही ते कुठे जाण्यासाठी फक्त पायी चालतात. यावेळी बिहार निवडणुकीत विजयी झालेले ८१ टक्के आमदार लक्षाधीश आहेत. मात्र मेहबूब आलम हे असे आमदार आहेत की, ज्यांना साधे चांगले घरही नाही. त्यामुळे ते आजकाल सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरले आहेत. भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या तिकिटावर मेहबूब आलम चौथ्यांदा आमदार निवडून आले आहेत. त्यांनी कटिहार जिल्ह्यातील बलरामपूर विधानसभा जागा ५३ हजार मतांच्या फरकाने जिंकली आहे, हा बिहार निवडणुकीतील सर्वात मोठा विजय आहे.