पाटणा – बिहार विधानसभा निवडणूक २०२० च्या एक्झीट पोलच्या निकालानंतर कॉंग्रेसने पुन्हा एकदा गटतटाच्या वाढत्या राजकारणामुळे आमदार फुटीच्या भीतीने विजयी आमदारांना एकत्र ठेवण्यासाठी हालचाली सुरू आहेत. त्याचबरोबरच हायकमांडच्या आदेशाने पक्षाचे ज्येष्ठ नेते राज्यात भविष्यातील सरकारबद्दल मित्रपक्षांशीही चर्चा करतील.
कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी अनेक राज्यांमधील निवडणुकीनंतर झालेल्या आमदार फोडाफोडीच्या राजकारणापासून धडे घेत हे कडक पाऊल उचलले आहे. राहुल गांधींच्या आदेशावरून कॉंग्रेसचे सरचिटणीस रणदीपसिंग सुरजेवाला, दक्षिण बिहारचे प्रभारी वीरेंद्रसिंह राठोड, पंजाबचे आमदार गुरकीत सिंह, राजस्थान सरकारचे मंत्री रघु शर्मा, राजेंद्र यादव, झारखंड सरकारचे आरोग्यमंत्री बन्ना गुप्ता, स्क्रीनिंग कमिटीचे सदस्य काझी निजामुद्दीन यांच्यासारखे ज्येष्ठ नेते बिहारमध्ये पोहोचले आहेत.
सोमवारी पहाटेपर्यंत कॉंग्रेसच्या सूत्रांनी उत्तर बिहारचे प्रभारी अजय कपूर, स्क्रीनिंग कमेटीचे अध्यक्ष अविनाश पांडे आणि इतर अनेक नेते बिहारमध्ये येण्याची माहिती दिली आहे. कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते अन्य पक्षांशी सहकार्य करण्यासाठी पाटण्या येथे पोहोचले असून तेथे ते सरकार स्थापनेत सहकार्य करतील. त्याचबरोबर पक्षाच्या विजयी उमेदवारांना एकत्र ठेवण्याची जबाबदारीही त्यांची असेल.
महाआघाडीचे निकाल येताच आमदार फोडाफोडीचा धोका वाढेल, अशी भीती काँग्रेसला वाटत आहे. या संदर्भात, सर्वांना सावधगिरीने राहायचे सांगितले जात आहे.
दरम्यान, कॉंग्रेस सरचिटणीस सुरजेवाला यांनी पाटणा येथे आल्यानंतर सांगितले की, बिहारच्या जनतेने केवळ सत्ता परिवर्तनासाठी नाही तर सध्याची वाईट व्यवस्था बदलण्यासाठी मते दिली आहेत. या निकालांमधून असे म्हटले जात आहे की, राज्यात महायुती होऊन त्यामधून सरकार बनवेल.