नवी दिल्ली – बिहारचे मुख्यमंत्री म्हणून नितीश कुमार सोमवारी सातव्यांदा मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहे. हा शपथविधी सोहळा सोमवारी (१६ नोव्हेंबर) सकाळी ११.३० वाजता होणार आहे. एनडीएच्या विधीमंडळाच्या बैठकीत त्यांची नेतेपदी निवड झाली व त्यांचा मुख्यमंत्री बनण्याचा मार्ग मोकळा झाला. सायंकाळी ते राज्यपाल यांच्याकडे सत्ता स्थापनेचा दावा करणार आहे.
दुसरीकडे उपमुख्यमंत्री पदाबाबत मात्र वेगवेगळे अंदाज बांधले जात आहे. हे पद भाजपकडे असणार असल्यामुळे येथे दावेदारांची संख्या मोठी आहे. पण, सुशीलकुमार मोदी यांनाच हे पद दिले जाणार असल्याचे बोलले जात आहे. बिहारच्या सार्वत्रिक निवडणुकीत भाजपला ७४ तर जेडीयुला ४३ जागा मिळाल्या होत्या. त्यामुळे भाजपच्या काही नेत्यांनी पक्षाचा मुख्यमंत्री असावा असे मत व्यक्त केले होते. पण, राष्ट्रीय नेतृत्वाने मुख्यमंत्रीपदी नितीश कुमारच असतील असे सांगितले. त्यानंतर रविवारी सरंक्षण मंत्री राजनाथ सिंह व महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झालेल्या एनडीएच्या विधीमंडळाच्या बैठकीत त्यावर शिक्कामोर्तब झाले.