नवी दिल्ली – भारत आणि चीनमधील संबंध गेल्या ६५ वर्षापासून तणावपूर्ण आहेत, सध्या देखील सीमेवरील वादातून कुरबुरी सुरूच आहेत. त्यामुळे आयात-निर्यात व्यापार क्षेत्रावर देखील त्याचा परिणाम झाला आहे. परंतु या तणावादरम्यान एक धक्कादायक बाब समोर आली आहे. ती म्हणजे बिहारमधील सीमावर्ती भागातील खडकाळ जमिनीत उत्पादित झालेल्या निकृष्ट तांदळापासून चीन, भूतान आणि व्हिएतनाममध्ये दारू तयार केली जात आहे.
बिहारमधील डोंगराळ भागातील अनेक शेतात काळपट व निकृष्ट दर्जाचा तांदूळ पिकविला जातो. तसेच रेशन दुकानात देखील फक्त हाच तांदूळ उपलब्ध असतो. मात्र रेशन दुकानांतून या तांदळाचा काळाबाजार करणे सुरु आहे. कारण चीन, भूतानमधील या तांदळाची मागणी वाढली आहे. रेशन दुकानांत आढळणार्या तांदळाची गुणवत्ता निकृष्ट असल्याने ग्राहकांना तो खायला आवडत नाही. त्यामुळे रेशन दुकान व्यापाऱ्यांना तो कमी दराने विक्री करतात. हा तांदूळ परदेशी एजंट खरेदी करतो आणि भूतान, चीन आणि व्हिएतनाम येथे पाठवितो, जिथे त्यापासून दारू बनविली जाते.
मुख्य म्हणजे चोरट्या मार्गाने आसाम, पश्चिम बंगाल, गंगटोक मार्गे भूतान, चीन आणि व्हिएतनामला पाठविला जात आहे. अलिकडच्या काळात या तांदळाची मागणी वाढली आहे आणि त्याचा दरही बऱ्यापैकी वाढला आहे. दारूभट्टीमुळे सीमांचल भागात याला मोठी मागणी आहे. अशा डोंगराळ भागात जिथे भातपिकाची लागवड होत नाही, अशा ठिकाणी येथील शासकीय धान्य दुकानात तांदुळ (भात) देतात. हेच या भागातील काही व्यापारी लोक असा तांदूळ विकत घेतात आणि महागड्या किंमतीत देखील खरेदी करतात. आसाम, पश्चिम बंगाल आणि इतरत्र दररोज अनेक ट्रक विविध सामान भरलेल्या गोण्यातून चोरटया पध्दतीने तांदळाच्या गोण्या भरून घेऊन जातात.