पिंपळगाव बसवंत – कारसूळ (ता. निफाड) परिसरात बिबट्याने शेळ्यांवर हल्ला केला असून त्यात एका शेळीचा मृत्यू झाला. तर चार शेळ्या जखमी झाल्या आहेत. त्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण आहे. बिबट्याच्या पायाचे ठसेही परिसरात आढळून आले आहेत.
लोणवाडी- कारसूळ रस्त्यावर असलेल्या जखमाता देवी मंदिराजवळ राहणाऱ्या साहेबराव बागुल यांच्या शेतात सोमवारी पहाटे घराजवळ असलेल्या शेळ्यांवर बिबट्याने हल्ला केला. हा प्रकार साहेबराव बागुल व त्याच्या कुटुंबाच्या लक्षात आल्यावर त्यांनी आरडाओरडा केल्याने बिबट्याने तेथून धूम ठोकली. परंतु, बिबट्याच्या हल्ल्यात एक शेळी मृत, तर चार शेळ्या जखमी झाल्या. त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वन विभागाने बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरा लावावा, अशी मागणी कारसुळचे सरपंच रामकृष्ण कंक यांनी केली आहे. वन विभाग आणि पशु वैद्यकीय विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला आहे. तसेच जखमी शेळ्यांवर उपचारही केले.
बिबट्याला जेरबंद करण्यासाठी वनविभागाने तत्काळ पिंजरे लावावे. परिसरात भीतीचे वातावरण असून त्याचे गांभिर्य वनविभागाने ओळखावे. आम्ही सर्वतोपरी सहकार्य करु.
– रामकृष्ण कंक, सरपंच, कारसूळ