नाशिक – कोरोना लसीकरणासाठीची रंगीत तालिम (ड्राय रन) शुक्रवारी नाशिकरोडच्या बिटको हॉस्पिटलमध्ये पार पडला. यासाठी महापालिकेने मोठी तयारी केली होती. हा ड्राय रन यशस्वी झाल्याचे महापालिका आयुक्त कैलास जाधव यांनी सांगितले आहे.
शहरामध्ये कोरोना लस आल्यानंतर करावयाच्या कामगिरीबाबत महापालिकेला मार्गदर्शक सूचना प्राप्त झाल्या आहेत. त्या अनुषंगाने मनपाच्या नवीन बिटको रुग्णालयात रंगीत तालीम घेण्यात आली. त्यासाठी २५ आरोग्यसेवकांची निवड करण्यात आली होती. याठिकाणी या रंगीत तालमीत विविध टप्प्यात नियोजन करण्यात आले. हा ड्राय रन असा पार पडला
– सुरुवातीला ज्या व्यक्तीला लस द्यावयाची आहे त्या व्यक्तीने प्रवेश केला
– त्या व्यक्तीच्या हाताची स्वच्छता करण्यासाठी त्याठिकाणी सॅनिटायझर व साबणाची व्यवस्था करून हाताची स्वच्छता करण्यासाठी सूचित करण्यात आले
– यादीत त्या व्यक्तीचे नाव तपासण्यात आले
– त्या व्यक्तीला त्याच्या मोबाईलवर आलेला मेसेज तपासण्यात आला
– पल्स ऑक्झिमीटरने त्या व्यक्तीची तपासणी करून तिला टोकन देण्यात आले
– त्या व्यक्तीला प्रतिक्षा कक्षात बसविण्यात आले
– टोकनचा नंबर पुकारल्यानंतर त्या व्यक्तीने लसीकरण कक्षात प्रवेश केला
– संबंधित डॉक्टर त्या व्यक्तीस लसीकरणाबाबत मार्गदर्शन दिले.
– लस घेतलेली व्यक्ती त्यानंतर ३० मिनिटे डॉक्टर व आरोग्य सेवकांच्या निरीक्षणात राहिली
अशा पद्धतीने ही रंगीत तालीम पार पाडली. रंगीत तालमीची सविस्तर माहिती आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. बापूसाहेब नागरगोजे, डॉ. जितेंद्र धनेश्वर, कोरोना नोडल अधिकारी डॉ. आवेश पलोड यांनी दिली. तसेच या रंगीत तालमी नंतर आयुक्तांनी रुग्णालयातील ऑक्सिजन पुरवठ्याबाबत आढावा घेतला व त्याची पाहणी केली.
यावेळी अतिरिक्त आयुक्त प्रवीण आष्टीकर, नगरसेवक जगदीश पवार, रमेश धोंगडे, सहाय्यक आरोग्य अधिकारी डॉ. प्रशांत शेटे, विभागीय अधिकारी डॉ. दिलीप मेणकर, विभागीय स्वच्छता निरीक्षक संजय गोसावी आदी उपस्थित होते.