मुंबई – जगभरात बिटकोईनचे वर्चस्व वाढत आहे. आता जगातील अफाट लोकप्रिय असलेली इलेक्ट्रीक कंपनी टेस्लाने देखील म्हटले आहे की ते बिटकोईनला त्यांच्या वाहनांच्या देयकाच्या स्वरुपात स्वीकार करतील. सोबतच उबर कंपनीही आता बिटकोईनच्या दिशेने वळत आहे.
काय आहे बिटकोईन
बिटकोईन ही एक व्हर्च्युअल करन्सी आहे. याची सुरुवात २००९ मध्ये झाली होती आणि आता ती हळूहळू प्रचंड लोकप्रिय होत आहे. आता तर एक बिटकोईनची किंमत लाखो रुपयांच्या बरोबरीने पोहोचली आहे. याला क्रिप्टोकरन्सीदेखील म्हणतात कारण देयके देताना क्रिप्टोग्राफीचा वापर केला जातो. याचाच अर्थ या करन्सीला भविष्यातील करन्सीदेखील म्हणता येईल.
कसा होतो व्यवहार
बिटकोईनच्या व्यवहारासाठी ग्राहकाला खाजगी डिजीटल माध्यमावरून देयकाचा संदेश पाठवावा लागतो. ज्याला जगभरात विस्तारलेल्या विकेंद्रीकृत नेटकवर्कच्या माध्यमातून सत्यापित केले जाते. या माध्यमातून दिली जाणारी रक्कम डेबीट किंवा क्रेडीट कार्डच्या माध्यमातून होणाऱ्या व्यवहारापेक्षा वेगळी आहे.
बिटकोईन एक आभासी मुद्रा आहे. त्याचा वापर केवळ आनलाईन व्यवहारासाठीच केला जातो. बिटकोईनच्या मुल्यात होणारा मोठा चढ–उतार लक्षात घेऊन कायमच हा प्रश्न उपस्थित केला जातो की एक मुद्रा म्हणून काम करण्यास बिटकोईन सक्षम आहे की नाही. कोणत्याही केंद्रीय बँकेशी संबंधित नसल्यामुळे याचा व्यवहार खासगी स्तरावर होत आहे.
भारतात १० वर्षे कारावास
क्रिप्टोकरन्सीवर प्रतिबंध आणि अधिकृत डिजीटल मुद्रा विधेयक २०१९ च्या मसुद्यात असा प्रस्ताव देण्यात आला होता की भारतात क्रिप्टोकरन्सीची खरेदी–विक्री करणाऱ्याला १० वर्षांची शिक्षा होईल. या विधेयकानुसार क्रिप्टोकरन्सी तयार करणारा, त्याचा व्यवहार करणारा, खरेदी–विक्री करणारा सारेच या शिक्षेस पात्र ठरतील.