नवी दिल्ली – थंडीत कोरोनाची दुसरी लाट येणार असून फेब्रुवारीत कोरोनाचा कहर आटोक्यात येणार असल्याची शुभवार्ता आहे. सप्टेंबरमध्ये कोरोनाची सर्वोच्च पातळी होती मात्र, फेब्रुवारीत कोरोना जवळपास संपुष्टात येईल. केंद्र सरकारने स्थापन केलेल्या वैज्ञानिकांच्या नॅशनल सुपरमॉडेल समितीने हा दावा केला आहे. आयआयटी हैदराबाद आणि कानपूरसहित अनेक प्रतिष्ठित संस्थांचे तज्ज्ञ या समितीत आहेत. दरम्यान, थंडीत कोरोनाची दुसरी लाट येण्याचा इशारा टास्क फोर्सचे प्रमुख व्ही. के. पॉल यांनी दिला आहे.
दरम्यान, केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी मोठा खुलासा केला आहे. देशात सामुदायिक संसर्ग झाला असल्याचे त्यांनी सांगितले आहे. प्रथमच सरकारच्यावतीने कुणीतरी हे मान्य केले आहे.
केंद्र सरकारने जूनमध्ये ‘नॅशनल सुपर मॉडेल फॉर कोविड १९ प्रोग्रेशन’ हा प्रकल्प सुरू केला. यात विविध प्रकारचे तज्ज्ञ आणि वैज्ञानिकांनी प्रत्यक्ष डेटाच्या आधारावर गणिती आणि सांख्यिकी मॉडेल विकसित केले. त्याआधारे विविध प्रकारचे अंदाज देण्याचे निश्चित केले. कोरोनाची अँटिबॉडी शरीरात किती दिवस राहते, याची सध्या कुठलीही माहिती नाही. त्यामुळे दुसरी किंवा तिसरी लाट केव्हा येईल याचा अंदाज या मॉडेलद्वारे लावता येणार नाही, असे समितीचे प्रा. महेंद्र अग्रवाल यांनी सांगितले आहे.