इस्लामाबाद ः वाढत्या अश्लीलतेमुळे सध्या बलात्कार होत आहेत, असे वक्तव्य पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी केल्यानंतर त्यांच्यावर सोशल मीडियावर टीका होत आहे. इस्लाम धर्मात पडदा पद्धतीमुळे प्रलोभनापासून बचाव होतो, असे त्यांनी म्हटले आहे. परंतु सोशल मीडियावर त्यांच्यावर टीकेचा भडिमार होत आहे. इम्रान खान क्रिकेटपटू असतानाचा हा व्हिडिओ समुद्र किनारी एका बिकनीतील मुलीसोबतचा आहे.
देशात कायदा सुव्यवस्था राहिलेली नाही. बलात्काराच्या घटना वाढत आहेत. सरकार काय पावले उचलत आहे, असा सवाल ते व्हिडिओत उपस्थित करताना दिसत आहेत. अश्लीलतेमुळे अशा घटना वाढत असल्याची टिप्पणी त्यांनी केली आहे. अशा घटना फक्त सरकारच रोखू शकत नाही. अश्लीलतेविरोधात समाजाने पुढे आले पाहिजे. मुस्लिम समाजात प्रलोभने आणि आकर्षणापासून बचावासाठी पडदा पद्धत रूढ झाली आहे. अश्लीलतेमुळे घटस्फोटाची प्रकरणे ७० टक्क्यांपर्यंत वाढली आहेत, असे इम्रान खान म्हणतात.
त्यांच्या या व्हिडिओवर ट्विटरवर अनेक युजर्सनी कठोर शब्दात प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. पाकिस्तानातील अशा घटना रोखण्याऐवजी पंतप्रधान आधारहिन स्पष्टीकरण देत आहेत, अशा प्रतिक्रिया काही युजर्सनी व्यक्त केल्या. तर काहींनी पाकिस्तान सरकारकडून निष्क्रियता लपवण्यासाठीचे प्रयत्न सुरू असल्याचे म्हटले आहे.
जिओ न्यूजच्या अधिकृत माहितीनुसार, पाकिस्तानात दररोज ११ बलात्कार होतात. सहा वर्षात २२ हजारांहून अधिक प्रकरणे नोंदवली गेली आहेत. त्यामध्ये फक्त ७७ आरोपींना शिक्षा झालेली आहे.
https://twitter.com/desmukh/status/1378940968783646722?s=20