ओझर येथील हिन्दुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेडमधील (एचएएल) कर्मचारी हेरगिरी प्रकरणात सापडल्यानंतर नाशिकमधील संरक्षण संस्थांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. यासंदर्भात प्रकाश टाकणारी ही वृत्तमालिका….
इंडिया दर्पण विशेष वृत्तमालिका – सुरक्षेचे तीनतेरा – भाग ७
बाहेर सुरक्षा रक्षक आत मात्र मोकळे रान
भावेश ब्राह्मणकर, नाशिक
नाशिक शहर परिसरात असलेल्या सुरक्षा संस्थांमध्ये एक बाब प्रकर्षाने समोर येत आहे ती म्हणजे या संस्थांच्या गेटवर कडक सुरक्षा व्यवस्था आहे. मात्र, या संस्थांच्या आतला कारभार मात्र रामभरोसेच आहे की काय, असा प्रश्न निर्माण होत आहे. विविध घटनांमधून ते स्पष्ट होत आहे. त्यामुळे असुरक्षेची तलवार टांगतीच आहे.
ओझर येथे एचएएल, त्यालगत संरक्षण विकास व संशोधन संस्था (डीआरडीओ), नाशिक शहरात महाराष्ट्र पोलिस अकादमी, नोट प्रेस, सिक्युरीटी प्रेस, कम्बॅट एव्हिएशन ट्रेनिंग (कॅट), देवळाली कॅम्प येथे आर्टिलरी सेंटर, एकलहरे येथे औष्णिक विद्युत प्रकल्प, रेल्वेचे इरिन अशी विविध प्रकारच्या संरक्षण संस्था कार्यरत आहेत. या सर्व संस्था या देशाच्या सुरक्षा व्यवस्थेशी थेट निगडीत आहेत. त्यामुळे या संस्थांची सुरक्षाही अतिशय महत्त्वाची आहे. एचएएलमध्ये घडलेल्या हेरगिरी प्रकरणामुळे या संस्थांच्या सुरक्षेचा प्रश्न समोर आला आहे. या सर्व संस्थांच्या प्रवेशद्वारावर अतिशय चोख सुरक्षा व्यवस्था आहे. आगंतुकाला सहजासहजी प्रवेश करणे शक्य होत नाही. मात्र, या संस्थांच्या आतील कारभार मात्र जणू रामभरोसेच आहे की काय, असे चित्र आहे.
ओझर एचएएलच्या परिसरात असलेल्या कार्गो कॉम्प्लेक्समधील सीसीटीव्ही आणि हायलोडरचे नुकसान करण्याची हिंमत कंत्राटी कर्मचाऱ्यांकडून होते यातूनच याठिकाणचे खरे चित्र समोर येत आहे. अतिशय संवेदनशील असलेल्या ठिकाणी एखाद्या व्यक्तीचे एवढे धाडस का आणि कसे होते, हा प्रश्न सुरक्षा व्यवस्थेवरच प्रश्नचिन्ह निर्माण करतो. केवळ एचएएलच नाही तर अन्य संस्थांमध्येही असेच आहे. त्यामुळे सुरक्षा कुंपण भेदून एखाद्याने प्रवेश मिळवला तर आत त्याला जणू मोकळे रानच मिळते, अशी स्थिती आहे. सुरक्षा संस्थांचा परिसर मोठा असल्याने या सर्वच परिसरावर सीसीटीव्हीची नजर आहेच, असे नाही. संरक्षण संस्थांच्या कुंपण तसेच संरक्षक भींतींना अनेक ठिकाणी भगदाड पडले आहे. ही बाब या संस्थांची सुरक्षा धोक्यात आणणारीच आहे.
अतिक्रमणाचा प्रश्नही गंभीर
सर्व सुरक्षा संस्थांच्या लगत मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाले आहे. याकडे अद्यापही गांभिर्याने पाहिले जात नाही. काही ठिकाणी तर सर्रास झोपडपट्टी विकसित झाली आहे. वर्षानुवर्षे तेथे राहणाऱ्यांची संख्याही वाढली आहे. पोलिस अकादमीची मागची बाजू असो की नोट प्रेस या सर्व ठिकाणी हीच गत आहे. याप्रकरणी महापालिका, पोलिस आणि सुरक्षा संस्था सर्वच एकमेकाकडे बोट दाखवितात.
शिरसाठला न्यायालयीन कोठडी
एचएएलमधील हेरगिरी प्रकरणी अटक केलेल्या दीपक शिरसाठला न्यायालयीन कोठडी देण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. दहा दिवसांची पोलिस कोठडी संपुष्टात आल्याने त्यास न्यायालयात हजर करण्यात आले. दरम्यान, लंडनस्थित एका महिलेला फोटो पाठविल्याचे शिरसाठ याने कबुल केले आहे. या महिलेच्या संपर्कात तो कधीपासून होता, काय काय माहिती त्याने दिली यासह अन्य बाबींचा तपास एटीएसकडून सुरू आहे.
(समाप्त)