पुणे – बालभारतीने १९९० च्या दशकात महाराष्ट्रातील दिग्गज साहित्यिक, संगीतकार मंडळींसोबत एक अभिनव प्रयोग केला. त्या प्रयोगाचं नाव होतं बोलकी बालभारती! या माध्यमातून पाठ्यपुस्तकातील गाजलेल्या कवितांना चाली लावून त्यांची गाणी केली गेली. सोबत काही निवडक पाठांचे वाचन देखील केले. आता कोरोना काळात सर्व मुले घरीच असल्याने मुलांना शिक्षणासाठी या उपक्रमाचा मोठा उपयोग होऊ शकतो .
विशेष म्हणजे ही गाणी छोट्या मुलांनीच गायली. काही कविता आणि गद्यपाठ मात्र मोठ्या माणसांनी छोट्या मुलांसाठी केले.या गाण्याना चाली लावल्या होत्या ज्येष्ठ संगीतकार राम कदम आणि यशवंत देव यांनी आणि वाचन केले होते वसंत बापट, मंगेश पाडगावकर, नारायण सुर्वे, पु. ल. देशपांडे,शांता शेळके, शंकर पाटील आणि किशोरचे संपादक वसंत सबनीस यांनी. छोट्यांनी गाणी कशी म्हणावी,कसं नीट वाचावं,स्वच्छ, स्पष्ट आणि चढ उतारांसह अर्थ समजून घेऊन कसं वाचन करावं. भाषेची लय कशी ओळखावी, डौल कसा सांभाळावा यासाठी ही ध्वनिफीत तयार झाली.
यात अत्यंत गाजलेल्या अशा टप टप टाकीत टापा चाले माझा घोडा, फुलपाखरू छान किती दिसते, या बाई या बघा बघा कशी माझी रुसली बया, केळीच्या बागा मामाच्या, आनंदाने गाऊया रिमझिम पाऊस झेलूया,चल ग सई, कुठं ग बाई, इंजिनदादा इंजिनदादा, उघड पावसा ऊन पडू दे,नाच रे मोरा, या बाई या बकुळीच्या झाडाखाली फुले वेचुया, ते अमर हुतात्मे झाले, जात कोणती पुसू नका, आज ये अंगणा पाहुणा गोजिरा, पक्षी जाय दिगंतरा इ. आजही आपल्या मनामनात वसलेली गाणी होती. काळाच्या ओघात विस्मृतीत गेलेली ही ध्वनिफीत पुन्हा मिळवली आणि त्याला नव्या MP3 रूपात कन्व्हर्ट करून घेतले. नव्या पिढीतील मुलांना देखील तितकीच आपली वाटतील इतकी गोडी या गाण्यांमध्ये आहे. आता एक प्रयोग म्हणून त्यातील `टप टप टाकीत टापा चाले माझा घोडा` हे गाणे माझा मित्र सोहम सबनीस याच्या मदतीने व्हिडीओ रूपात आणण्याचा प्रयत्न केला आहे. हा प्रयोग कसा वाटला ते आवर्जून सांगा. भविष्यात यातील सगळीच गाणी व्हिडीओ स्वरूपात आणण्याचा मानस आहे. तुमच्या प्रतिक्रिया आवर्जून कळवा, असे बालभारतीचे वरिष्ठ अधिकारी किरण केंद्रे यांनी म्हटले आहे.