मुंबई – पवार कुटुंबातील सर्व सदस्यांच्या एकत्रित उपस्थितीत बारामतीत परंपरेनुसार दरवर्षी साजरा होणारा दिवाळीचा सण तसेच दिवाळी पाडव्याला होणाऱ्या हितचिंतकांच्या स्नेहभेटी, शुभेच्छांचा पारंपारिक कार्यक्रम यंदा रद्द करण्यात आला आहे. नागरिकांमध्ये कोरोना संसर्ग टाळण्यासाठी यंदा सामुहिक दिवाळी साजरी न करण्याचा निर्णय पवार कुटुंबियांनी घेतला आहे. त्यामुळे दरवर्षी दिवाळीत भेटण्यासाठी, शुभेच्छा देण्यासाठी येणाऱ्या सहकाऱ्यांनी, हितचिंतक बंधु-भगिनींनी यंदा बारामतीला न येता आपापल्या घरुनच शुभेच्छा द्याव्यात. कोरोना प्रतिबंधक नियमांचे पालन करीत आपापल्या घरीच सुरक्षित दिवाळी साजरी करावी. कोरोनाला हरवल्यानंतर पुढची दिवाळी मात्र, पारंपरिक उत्साहात, जल्लोषात बारामतीला एकत्रित येऊन साजरी करुया, असं विनंतीवजा आवाहन पवार कुटुंबियांच्या वतीने राज्यातील जनतेला व हितचिंतक बंधु-भगिनींना करण्यात आले आहे. राष्ट्रवादीचे नेते शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे, आमदार रोहित पवार आणि पवार कुटुंबियांच्यावतीने संयुक्त निवेदन प्रसिद्धीस देण्यात आले असून बारामती येथे परंपरेनुसार दरवर्षी होणारा सामुहिक दिवाळी उत्सव तसेच पाडव्याचा स्नेहभेटीचा पारंपारिक कार्यक्रम कोरोनामुळे यावर्षी रद्द करावा लागत असल्याबद्दल त्यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे.