वॉशिंग्टन – अमेरिकेचे नवे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांनी सत्तेची सूत्रे हाती घेतल्याबरोबर निर्णयांचा धडाका लावला आहे. त्यात त्यांनी इमिग्रेशन बिल संसदेकडे पाठविण्याचा निर्णय घेतला Eus. इमिग्रेशनशी संबंधित बिलात त्यांनी व्यापक सुधारणांचा प्रस्ताव ठेवला आहे. या सुधारणांच्या माध्यमातून अमेरिकेत राहणाऱ्या लाखो अप्रवासी नागरिकांसाठी अमेरिकेचे नागरिकत्व घेण्याचा मार्ग खुला होणार आहे. त्याचा पाच लाख भारतीयांनाही फायदाच होणार आहे.
अमेरिकेचा नागरिकत्व कायदा-२०२१ या बिलात ग्रीन कार्जसाठी प्रत्येक देशासाठी निश्चित करण्यात आलेली तरतूद त्यांनी रद्द करण्याचाही प्रस्ताव दिला आहे. हा निर्णय भारतीयांसाठी अत्यंत महत्त्वाचा आणि उपयुक्त ठरेल. कारण लाखो भारतीय अमेरिकेत कित्येक वर्षांपासून ग्रीन कार्डची प्रतिक्षा करीत आहेत. हे कार्ड मिळाल्यास अमेरिकेत कायमस्वरुपी वास्तव्य आणि नोकरी करण्याचा अधिकार मिळणार आहे. या बिलात एच-१ बी व्हिसाधारकांना आश्रित लोकांना काम करण्याचा अधिकार देण्याची शिफारसही करण्यात आली आहे. अमेरिकेत या व्हिसावर लाखो भारतीय आयटी सेक्टरमध्ये काम करीत आहेत. अमेरिकेत जवळपास १.१ कोटी लोक कुठल्याही कागदपत्रांशिवाय राहतात, असा अंदाज आहे. यात पाच लाख भारतीयांचाही समावेश असल्याचे बोलले जाते. प्रस्ताव पारित झाल्यास या नागरिकांनाही नागरिकत्व मिळण्याचा मार्ग खुला होऊ शकतो. ट्रम्प यांनी एच-१ बी व्हिसा आणि ग्रीन कार्डसह नागरिकत्व नियमांना कठोर केले होते. ज्यो बायडेन यांनी आपला कार्यकाळ सुरू होताच पहिल्याच गिनशी १७ कार्यकारी आदेशांवर स्वाक्षऱ्या केल्या. या माध्यमातून त्यांनी ट्रम्प यांची विदेश निती आणि राष्ट्रीय सुरक्षेच्या संदर्भातील निर्णयांना जोरदार धक्का दिला. या निर्णयांमध्ये पॅरीस जलवायू कराराचा पुन्हा एकदा विचार करणे, डब्ल्यूएचओला अमेरिकेपासून तुटण्याचे रोखणे, १७ मुस्लीम तसेच आफ्रिकी देशांच्या नागरिकांच्या प्रवासावर लावण्यात आलेली बंधने उठविणे तसेच मेक्सिको सीमेवर भिंत उभी करण्याचे काम तातडीने थांबविणे आदींचा समावेश आहे.