नवी दिल्ली – एटीएममधून पैसे काढण्यासाठी आता डेबीट कार्डची आवश्यकता नसेल. युपीआय एपच्या माध्यमातून क्यूआर कोड स्कॅन केल्यावरही एटीएममधून पैसे काढता येणार आहेत. एटीएम निर्माता एनसीआर कॉर्पोरेशनने म्हटले आहे की युपीआय प्लॅटफॉर्मवर आधारित पहिले इंटर अॉपरेबल कार्डलेस कॅश विड्रॉल (आयसीसीडब्ल्यू) लॉन्च केले आहे.
ही नवी सुविधा सुरू करण्यासाठी सिटी युनियन बँकेने एनसीआरसोबत हात मिळवले आहेत. बँकेने क्यूआर कोड आधारित ही सुविधा सुरू करण्यासाठी आपले १ हजार ५०० एटीएम अपग्रेड केले आहेत. ग्राहकांना नेक्स्ट लेव्हलचे समाधान देण्यास स्वतःला सक्षम करण्याच्या दृष्टीने आम्ही हा निर्णय घेतल्याचे बँकेच्या प्रबंध संचालकांनी म्हटले आहे. सिटी युनियन बँकेच्या एटीएममधून युपीआय क्यूआर कोडचा वापर करून रोख काढता येणार आहे.
हे आहे आवश्यक…
गुगल पे, भीम एप, पेटीएम, फोनपे किंवा अमेझॉन पे आपल्या स्मार्टफोनमध्ये आवश्यक आहे. एटीएमच्या स्क्रीनवर दिसणारा क्यूआर कोड या अॅपच्या माध्यमातून स्कॅन करावा लागेल. त्यानंतरचही प्रक्रिया सर्वांनाच माहिती आहे. सुरुवातीला यात केवळ ५ हजार रुपये काढता येणार आहेत. भविष्यात ती मर्यादा वाढविण्याचा विचार सुरू आहे.
किती सुरक्षित
सुरक्षेच्या दृष्टीने बघितले तर आतापर्यंतची ही सर्वांत सुरक्षित सुविधा आहे. कारण कार्ड स्वाईप करायची गरज नाही. त्यामुळे कार्ड कॉपी होण्याची भिती नाही. शिवाय क्यूआर कोडची कॉपी तयार करणे शक्य नाही.