सोलापूर – सोलापूरच्या परितेवाडी शाळेतील शिक्षक रणजितसिंह डिसले यांना ग्लोबल टीचर पुरस्कार जाहीर झाला आहे. तब्बल ७ कोटी रुपये रकमेचा हा पुरस्कार प्रथमच महाराष्ट्रातील शिक्षकाला मिळाला आहे. जगातील १४० देशातील १२ हजारांपेक्षा जास्त शिक्षकांचे नामांकन करण्यात आले. त्यात डिसले यांची अंतिम विजेता म्हणून निवड करण्यात आली आहे.
सोलापूरच्या परितेवाडी शाळेतील विद्यार्थीप्रिय शिक्षक रणजितसिंह डिसले यांना लंडनस्थित वर्की फाऊंडेशनच्या विद्यमाने दिला जाणारा १- दशलक्ष डॉलर पुरस्कार रक्कम असलेला ग्लोबल टीचर पुरस्कार जाहीर झाला आहे. नाविन्यपूर्ण संकल्पना तसेच तंत्रज्ञानाची मदत घेऊन ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाची गोडी निर्माण करण्याचे डिसले यांचे कार्य अनुकरणीय व कौतुकास्पद आहे. डिसले यांनी क्युआर कोडेड पुस्तकाची संकल्पना मांडली. ती अतिशय अभिनव ठरली आहे. त्याची दखल घेतच त्यांना हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
दरम्यान, या निवडीमुळे डिसले यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत असून राज्यपालांसह सर्व मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.
निम्मी रक्कम दान
पुरस्काराच्या रकमेतील निम्मी रक्कम अंतिम फेरीतील ९ शिक्षकांना देण्याचे डिसले यांनी जाहीर केले आहे. यामुळे या ९ शिक्षकांना त्यांच्या देशातील हजारो मुलांना चांगले शिक्षण देता येईल. तसेच, उर्वरीत रक्कम ते टीचर इनोव्हेशन फंडसाठी वापरणार असल्याचे डिसले यांनी सांगितले आहे.