नवी दिल्ली – तुम्ही कितीही चटचट कामं उरकणारे असलात, आणि स्वयंपाकाच्या कामात तुम्हाला गती असली तरी एखाद्या तासात तुम्ही किती पदार्थ बनवू शकता? २, ३? चला अगदी ८-१० धरून चालू आपण. तरीही या चिमुरडीपेक्षा कमीच. तामिळनाडूतील या मुलीने ५८ मिनिटांमध्ये तब्बल ४६ पदार्थ बनवले आणि नवीन विश्वविक्रम केला आहे. तसेच तिने युनिको बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये स्थान पटकावले आहे.
हा विक्रम करणाऱ्या मुलीचे नाव आहे एसएन लक्ष्मी श्री श्री, आणि ती चेन्नई येथील आहे. हा विश्वविक्रम केल्यानंतर तिने प्रसारमाध्यमांना सांगितले की, मला मुळातच स्वयंपाकाची आवड आहे. आणि लॉकडाऊनच्या या काळात मी आईकडून अनेक गोष्टी शिकले. हा विश्वविक्रम केल्याचा मला फारच आनंद झाला आहे.
केरळमधील एर्नाकुलम येथील सान्वी एम प्रजीत या १० वर्षांच्या मुलीने नुकताच तासाभरात ३० पदार्थ करण्याचा विश्वविक्रम केला होता. लक्ष्मीने सान्वी हिचा विक्रम मोडून नवीन विक्रम प्रस्थापित केला आहे. अशाप्रकारे विश्वविक्रम करण्याची प्रेरणा आपल्याला वडिलांकडून मिळाल्याचे लक्ष्मीने सांगितले. तिचे हे कर्तृत्व अल्पावधीतच सोशल मीडियावर व्हायरल झाले आणि लोकांकडूनही तिला शाबासकीची थाप मिळाली.