स्पेन – वाढदिवस साजरा करण्याची प्रत्येकाची अनोखी रीत असते. निरनिराळ्या स्टाईलमध्ये वाढदिवस साजरा केला जातो. कोरोना महामारीच्या काळात स्पेनमधील लेबनीज महिलेने आपला ४० वा वाढदिवस अतिशय भव्यदिव्य शैलीत साजरा केला. दहा लोकांना घरी बोलावून नंतर २० शहरांमध्ये व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे मिनी पार्टी आयोजित केली होती. यात १५० हून अधिक पाहुणे उपस्थित होते. संपूर्ण उत्सवासाठी २१.५ दशलक्ष डॉलर्स म्हणजे सुमारे २१५ कोटी रुपये खर्च केला असल्याचे म्हटले जात आहे.
वाढदिवसासाठी आलिशान हिरे आणि मोत्यांनी भरलेला तब्बल २०० कोटी रुपयांचा खास गाऊन परिधान केला होता. ब्लॅक गाऊन डिझाइन करण्याचे काम ब्रिटनमधील नामांकित फॅशन डिझायनर डेबी विन्घॅम आणि डिजिटल कलाकार गॅरी मॅकक्वीन यांच्यावर सोपविण्यात आले होते. या जोडीने गाऊनमध्ये १ दुर्मिळ लाल हिरा बसवला होता. सुमारे १८३ कोटी रुपये या गाऊनसाठी खर्च करण्यात आला होता. मुख्य म्हणजे सेलिब्रेशन दरम्यान कोरोना संसर्ग होऊ नये यासाठी महिलेने सुमारे अडीच कोटीचे फेसशील्ड घातले होते, ज्यावर निळ्या, हिरव्या आणि पांढर्या डायमंड-स्टॅडेड नेकलेसने सजावट करण्यात आली होती. आयोजित पार्टीमध्ये घरी उपस्थित असलेल्या प्रत्येक पाहुण्याला हिऱ्यापासून बनवलेल्या ब्रेसलेटसह एक खास मास्क देण्यात आला. कोरोना महामारीच्या काळात स्पेनमध्ये अनेकांना आपला जीव गमवावा लागला असतांना दुसरीकडे या अनोख्या बर्थ डे सेलिब्रेशनची चर्चा होत आहे.