नवी दिल्ली : डिजिटल करन्सी बिटकॉइनच्या किंमतीतील वाढ मंगळवारी देखील कायम राहिली. आणि पहिल्यांदाच एका कॉइनची किंमत ५० हजारांहून अधिक झाली. मंगळवारी सकाळी १० वाजण्यापूर्वी जवळपास 6 वेळा या किंमतीत वाढ झाली. वर्षभरापूर्वी एका कॉइनची किंमत १० हजार डॉलर्स होती. गेल्या तीन महिन्यांत बिटकॉइनच्या किंमतीत जवळपास २०० टक्क्यांनी वाढ झाली आहे.
बिटकॉइनला चलन म्हणून मान्यता द्यायला अनेक कंपन्या तयार होत असतानाच त्याच्या किंमतीत सातत्याने वाढ होताना दिसते आहे. दरम्यान, सध्या जे बिटकॉइनची खरेदी करतात, ते याकडे सोन्यासारखी गुंतवणूक म्हणून पहात असावेत. कारण बार्टर एक्सचेंज प्रमाणे सध्या याचा वापर फार कमी ठिकाणी होतो.
जगातील सर्वात श्रीमंत आणि इलेक्ट्रिक कार कंपनी टेस्लाचे सीईओ एलन मस्क यांनी, बिटकॉइनमध्ये तब्बल १.५ अब्ज डॉलरची गुंतवणूक केल्याचे जाहीर केले होते. त्यानंतर बिटकॉइनच्या किंमतीत १५ टक्क्यांनी वाढ होत ती ४४ हजार १४१ डॉलर्सवर गेली होती. तेंव्हा प्रथमच त्याने ४४ हजारांची किंमत ओलांडली होती. याबरोबरच टेस्ला गाडीसाठी आपण याच चलनाचा वापर करणार असल्याचेही त्यांनी जाहीर केले होते.