मुंबई – बाळाचे पाय पाळण्यात दिसतात असे आपण म्हणतो. या म्हणीची प्रचिती देणारी घटना अलीकडेच जोधपूर येथे घडली. जोधपूर येथील पुजा बिश्नोई तीन वर्षांची होती तेव्हा आपल्यापेक्षा मोठ्या मुलांसोबत धावण्याची स्पर्धा करायची. त्यानंतर सहा वर्षांची असताना तिने १० किलोमीटरची मॅरेथॉन अवघ्या ४८ मिनीटांमध्ये पूर्ण केली. आणि आत नऊ वर्षांची असताना आलिम्पिकमध्ये देशासाठी सुवर्ण जिंकण्याचे तिचे स्वप्न आहे.
जोधपूरच्या जवळ गुडा बिश्नोइया या एका छोट्या गावात शेतकरी कुटुंबात तिचा जन्म झाला. लहान असताना ती मुलांसोबत रेस लावायची आणि त्यात हरायची. तेव्हा तिला दुःख व्हायचे. एक दिवस तिचे मामा सरवन बुधिया (माजी धावपटू) याच्याकडे तिने बोलून दाखवले. त्याचवेळी प्रशिक्षण घेण्याची इच्छा असल्याचे तिने मामाला सांगितले.
बुधिया हे जोधपूरच्या क्रीडा प्राधिकरणाशी जुळलेले होते. मात्र एका घटनेनंतर त्यांचे धावणे बंद झाले. पुजाने इच्छा व्यक्त केल्यानंतर बुधियाला वाटले के आपले अर्धवट स्वप्न हिच्या माध्यमातून पूर्ण करता येईल. त्यांनी पुजाला प्रशिक्षण द्यायला सुरुवात केली. काही महिन्यांनी जेव्हा तिने मुलांसोबत रेस लावली तेव्हा ती सर्वांत पुढे होती. त्यानंतर तिने मागे वळून बघितलेच नाही.
विश्वविक्रम आणि सुवर्णपदक
नोव्हेंबर २०१९ मध्ये पुजाने दिल्लीत आयोजित एका स्पर्धेत तीन किलोमीटरची रेस १.५० मिनीटात पूर्ण केली आणि विक्रम रचला. याशिवाय तिने तीन हजार मीटर, १५०० मीटर आणि ८०० मीटर श्रेणीत सुवर्ण पदक प्राप्त केले आहे. तिची कामगिरी बघून विराट कोहली फाऊंडेशनने पुजाला पूर्ण सहकार्य करण्याचा निर्णय दोन वर्षांपूर्वी घेतला.