नवी दिल्ली ः इंडोनेशिया आणि मलेशियामधून आयात केल्या जाणा-या पाम तेलाचं उत्पादन भारतात वाढल्यास सरकारचे दोन लाख कोटी रुपये वाचतील. पतंजलीच्या माध्यमातून त्याचे उत्पादन वाढवून जवळपास पाच लाख लोकांना रोजगारही देता येईल असं योगगुरू बाबा रामदेव यांनी म्हटलं आहे.
केंद्र सरकारचा अर्थसंकल्पावर प्रतिक्रिया देतांना ते म्हणाले की, अर्थसंकल्प सर्वसमावेशक असून, भारतीय इतिहासात प्रथमच आरोग्य क्षेत्रात भरीव तरतूद केली आहे. अर्थसंकल्पात सर्वांसाठीच काही ना काही आहे. देश आत्मनिर्भर बनण्याच्या दृष्टीनं पावलं टाकत आहे. आयात शुल्क वाढवणे, देशात निर्मिती वाढवणे, तसंच खाद्य तेलाचं उत्पादन वाढवल्यास नागरिकांना त्याचा लाभ होईल. निर्मिती क्षेत्रात भारत जगातील मोठा देश बनण्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं स्वप्न पूर्ण झाल्यास देशातील कोट्यवधी लोकांना रोजगार मिळेल, असं बाबा रामदेव यांनी सांगितलं. भारताला इंडोनेशिया आणि मलेशियातून पाम तेलाची आयात करावी लागते. पतंजलीच्या माध्यमातून खाद्यतेलाचं उत्पादान वाढल्यास देशातल्या पाच लाख नागरिकांना रोजगार मिळेल असं त्यांनी स्पष्ट केलं.
संतुलित अर्थसंकल्प
पायाभूत सुविधांच्या माध्यमातून देशाच्या विकासाला गती मिळते. ग्रामीण भागातील लोकांसाठीही अर्थसंकल्पात अनेक बाबी आहेत. सरकारने सर्वच गोष्टींचा विचार केला आहे. एकूणच बोलायचं झालं तर हा अर्थसंकल्प अत्यंत संतुलित आहे, असं बाबा रामदेव म्हणाले.