नवी दिल्ली – गेल्या काही दिवसांपासून सोशल मिडीयावर दिल्ली येथील ‘बाबा का ढाबा’ मोठ्या प्रमाणात चर्चेत होता. ज्या ठिकाणी लोक कधी फिरकत नव्हते अशा ठिकाणी कांता प्रसाद यांच्याकडून जेवण विकत घेण्यासाठी लोकांच्या रांगा पाहायला मिळत आहे. तसेच दिल्लीतल्या काही मोठ्या हस्तींनी देखील येथे हजेरी लावली व मालक कांताप्रसाद यांच्या बरोबरचे फोटो शेअर केले. मात्र, पुन्हा एकदा बाबा का ढाबा चर्चेत आला आहे.
यूट्यूबर गौरव वासनमुळे बाबा का ढाबा चर्चेत आला असल्याचा आरोप यूट्यूबर लक्ष्या चौधरी यांनी केला होता. त्यांनीच या ढाब्याची लोकप्रियता वाढविली. त्याचबरोबर आता गौरव वासनवर पैसे हडपल्याचा आरोप आहे. असे म्हटले जात आहे की, डोनेशनचे पैसे गौरव आणि त्यांच्या पत्नीच्या खात्यावर येत होते. मात्र, देणगीचे पैसे कांता प्रसादापर्यंत पोहोचले नाहीत. त्यामुळे कांता प्रसाद यांनी मालवीय नगर पोलिस ठाण्यात फसवणूकीची फिर्याद नोंदवली आहे. संबंधित तक्रारीवर तपास सुरु असल्याची माहिती पोलिस अधिकाऱ्यांनी दिली आहे. अद्याप कोणावरही एफआयआर दाखल करण्यात आलेले नाही असे पोलिसांनी सांगितले आहे. सदर प्रकरणातील वास्तव काय आहे याकडे सर्वांचे लक्ष आहे.