नाशिक – बाबाज् थिएटर्स आणि धर्मवीर युवा प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारपासून “लोकोत्सव २०२१” सांस्कृतिक सोहोळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. त्याचे उद्घाटन प्रमुख पाहुणे म्हणून श्री कपिकुल सिध्दपिठमच्या महंत तपोमूर्ती वेणाभारती आणि उपमहापौर भिकुबाई बागुल व मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने करण्यात आले.बाबाज् थिएटर्सचे संस्थापक अध्यक्ष प्रशांत जुन्नरे यांनी स्वागत केले व प्रास्ताविकात माहिती दिली .प्रा. प्रीतिश कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले. १३ फेब्रुवारी पर्यंत दररोज लोकोत्सवात भरगच्च कार्यक्रमांची विनामूल्य मेजवानी मिळणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
प.सा. नाट्यगृहात लोकनेते सुनील बागुल आणि युवानेते मनीष बागुल यांच्या वाढदिवसानिमित्त या सांस्कृतिक सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. लोकोत्सवाच्या प्रारंभी आज आर.एम.ग्रुप प्रस्तुत “रंग मऱ्हाटमोळा ” हा लोकसंगीताचा कार्यक्रम सादर करण्यात आला. ३५ कलाकारांंनी नृत्य, गायन वादनाने त्यात रंग भरले. यावेळी दीपक लोखंडे, श्रीकांत गायकवाड, सार्थक खैरनार, अमित पगारे, ऍना कांबळे यांनी विविधरंगी गाणी गायली. त्यांना फारुक पिरजादे, गंगा हिरेमठ, कन्हैया खैरनार, अमित तांबे, जतीन दाणी, बाबा सोनवणे यांनी सुरेल साथसंगत केली. धृवकुमार तेजाळे,प्रकाश साळवे यांनी मार्गदर्शन केले. धर्मवीर युवा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष किशोर बागुल यांनी आभार मानून नाशिककर रसिकांना दररोज उपस्थित राहण्याचे आवाहन केले. वासुदेव आला… या नृत्यासह तारपा, कोळी, गोंधळी नृत्यांमध्ये युवा कलाकार रंगून गेले. कार्यक्रमाला मोठ्या संख्येने रसिक उपस्थित होते.
सोमवारी लोकोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी सायंकाळी ६ वाजता पाटेकर ब्रदर्स प्रस्तुत बॉलिवूड नाईट्स हा जुन्या हिंदी गीतांचा रंगारंग कार्यक्रम होईल. या संपूर्ण सोहोळयात कोविडच्या नियमावलीचे काटेकोर पालन करण्यात येत आहे. राजेश पिंगळे,नारायण गायकवाड, सदानंद जोशी, सचिन दप्तरी, विजय निकम, किसन बल्लाळ, अमोल पाळेकर, प्रवीण कांबळे, जगदीश जंगम, विजय राजेभोसले, विकास बल्लाळ, कैलास पाटील आदी कार्यकर्ते सोहळ्याच्या यशस्वीतेसाठी प्रयत्नशील आहेत. ११ ते १३ दरम्यान बाबाज् करंडक राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धा होईल. त्यामध्ये निवडक ३० एकांकिका बघण्याची संधी नाशिककर रसिकांना मिळणार आहे.