नाशिक – उत्तर महाराष्ट्रामध्ये गेल्या ३ वर्षात तब्बल ५ हजार शेतकऱ्यांची फसवणूक झाल्याची बाब समोर आली आहे. तशी माहिती विशेष पोलिस महानिरीक्षक प्रताप दिघावकर यांनी दिली आहे.
शेतकऱ्यांची फसवणूक आणि त्यासंदर्भात पोलिस करीत असलेल्या कार्यवाही बाबत दिघावकर यांनी पत्रकार परिषदेत सविस्तर माहिती दिली. ते म्हणाले की, उत्तर महाराष्ट्रात शेतकऱ्यांची तब्बल १८ कोटी रुपयांची फसवणूक झाली आहे. यातील केवळ २ कोटी ७४ हजार रुपयेच परत मिळाले आहेत. तर ३ कोटी ६५ लाख पैसे परत मिळण्याची हमी मिळाली असल्याचे दिघावकर यांनी स्पष्ट केले आहे.
नाशकात सर्वाधिक तर धुळ्यात सर्वात कमी
उत्तर महाराष्ट्रात शेतकरी फसवणुकीचे ५९३ गुन्हे घडले आहेत. नाशिक जिल्ह्यात ५५९, अहमदनगरमध्ये २, जळगाव जिल्ह्यात १७, नंदुरबारमध्ये १३ तर धुळे जिल्ह्यात २ असे गुन्हे घडले आहेत. शेतकऱ्यांची ही फसवणूक आणि पैसे परत मिळविण्यासाठी १० विशेष तपास पथके (एसआयटी) नेमण्यात आली असल्याचे दिघावकर यांनी सांगितले. परराज्यातील व्यापाऱ्यांकडून पैसे मिळविण्याचे प्रयत्न पोलीस करणार आहेत.
९१ जणांवर गुन्हे दाखल
उत्तर महाराष्ट्रात ५ हजार शेतकऱ्यांची फसवणूक झाली आहे. या सर्व शेतकऱ्यांसाठी पोलिस कडक कारवाई करणार आहेत. म्हणूनच फसवणूक करणाऱ्यांच्या स्थावर व जंगम मालमत्ता जप्त करणार असल्याचे दिघावकर यांनी सांगितले. आतापर्यंत एकूण ९१ जणांवर गुन्हे दाखल झाले आहेत. १०३ जण पैसे देण्यास तयार झाले आहेत. काही वकीलांनीही याप्रकरणी पुढाकार घेतला असून ते मोफत खटला लढणार आहेत. अनेक व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांना चेक दिले. मात्र ते बाऊन्स झाले आहेत. याप्रकरणाचे खटले लढण्याचे वकीलांनी सांगितले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना पैसे मिळण्यात मोठी मदत होणार असल्याचा आशावाद दिघावर यांनी व्यक्त केला आहे.