नवी दिल्ली ः कोविड-१९ महामारीमुळे संपूर्ण जगात रोजगाराचे स्वरूप बदलत आहे. पुढील एका दशकात एकट्या भारतात १.८ कोटी लोकांना आपले रोजगाराचे स्वरूप बदलावे लागणार आहे. तर जागतिक पातळीवर १० कोटी लोक यामुळे प्रभावित होतील. मॅकेंझी ग्लोबल इन्स्टिट्यूटने एका सर्वेक्षणात सांगतिले, की २०३० पर्यंत जगभरात रोजगाराच्या स्वरूपात बदल संभावतात. किरकोळ बाजार, खानपान सेवा, हॉटेल आणि कार्यालय व्यवस्थापनांसारख्या क्षेत्रांमधील कामगारांवर सर्वात जास्त परिणाम होतील. महामारीमुळे कंपन्यासुद्धा नव्याने पद्धतीनं काम सुरू करत आहेत.
भारतासह आठ देशांमध्ये याचा सर्वात जास्त परिणाम दिसेल. सर्वेक्षणाच्या अहवालात म्हटले आहे की, ग्राहकांच्या आवडीनिवडी बदलल्यानं व्यावसायिकांना व्यवसायाचे मॉडेल बदलावे लागेल. आता ई कॉमर्स आणि व्यक्तिगतरित्या संपर्कात न येता कामांना चालना मिळत आहे. त्यामुळे दशकभरात मोठ्या अर्थव्यवस्था असलेल्या देशांमधील १० कोटी लोक प्रभावित होतील. त्यापैकी १.८ कोटी भारतातील असतील.
महामारीमुळे रोजगारांतील बदलाचा भारतीय बाजारावर कमी परिणाम दिसेल. कारण की भारतात एकूण कामाच्या ३५-५५ टक्के बाहेरील उत्पादन आणि देखभालीशी निगडित आहे. भारतात पायाभूत सुविधा आणि बांधकाम प्रकल्पांची संख्या जास्त आहे. रोजगाराच्या पद्धती बदलल्यानं व्यक्तिगत संपर्क आणि मानवी श्रमासारख्या कामांमध्ये २.२ टक्के घटन झाली आहे. तर कौशल्याधारित श्रमात ३.३ टक्के वाढ होईल. भविष्यात व्यावसायिक प्रवासात घट होईल. तसंच तासाच्या हिशेबाप्रमाणे काम करणारांची संख्या वाढेल.