नाशिक – ऑनलाईन गणेश विसर्जन टाईमस्लॅाट बुकिंग सुविधेला नाशिककरांचा प्रतिसाद लाभत आहे. आतापर्यंत २५०० हून अधिक नाशिककरांनी स्लॉट बुक केल्याचे महापालिकेने सांगितले आहे.
कोरोना विषाणूच्या साथीमुळे या वर्षीच्या गणेशोत्सवामध्ये गणेश विसर्जनाचे वेळी गर्दी टाळण्यासाठी नाशिक महानगरपालिका आणि फॉक्सबेरी टेक्नोलॉजिज् यांच्या वतीने ऑनलाईन गणेश विसर्जन टाईमस्लॅाट बुकिंग सुविधा सुरू करण्यात आली आहे.
शहरातील सार्वजनिक गणेशोत्सव शांततेत, सलोख्याने व सुरक्षित पद्धतीने साजरा करण्यासाठी महापालिका व पोलिस यंत्रणा विविध उपाययोजना करीत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून नाशिक महानगरपालिका क्षेत्रात गणेशमूर्ती विसर्जनासाठी ऑनलाईन टाइमस्लॉट बुकिंग सुविधा सुरु करण्यात आली आहे. या उपक्रमाला २५००+ पेक्षा जास्त नागरिकांनी प्रतिसाद दिला आहे. आतापर्यंत ११३१ नागरिकांनी अमोनियम बायकार्बोनेटचा लाभ घेतला आहे.
विसर्जनाचा टाइमस्लॉट बुक करण्यासाठी नाशिक महानगरपालिकेच्या https://covidnashik.nmc.gov.in:8002/covid-19.html या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन Ganpati Visarjan Booking हा पर्याय निवडल्यानंतर आपल्या भागातील कृत्रिम तलावांची किंवा मूर्ति स्वीकृती केंद्रांची यादी पहावी. गणेश मूर्ती विसर्जनासाठी आपल्या जवळच्या विसर्जन स्थळाचा टाइमस्लॉट बुक केल्यानंतर ही प्रक्रिया पूर्ण होईल. जास्तीत जास्त नागरिकांनी ऑनलाईन स्लॉट बुक करून महानगरपालिकेला योग्य नियोजन करण्यास सहकार्य करावे असे आवाहन महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.