अहमदाबाद ः कोरोनाकाळात सार्वजनिक ठिकाणी शिंकल्यानं अनेक जण संबंधिताकडे संशयाच्या नजरेनं पाहत होते. यादरम्यान वादाचे प्रकारही पहायला मिळाले होते. पण सार्वजनिक ठिकाणी शिंकल्याच्या वादाचे पर्यावसन मारहाणीत झाल्याची घटना गुजरातमधल्या नरोदा इथं घडली आहे. इथल्या लोकरक्षक दलाच्या जवानाला चार-पाच जणांनी बेदम मारहाण केली. या घटनेत संबंधित पोलिसाचं नाक तुटलं असून डोळ्याच्या आसपास इजा झाली आहे.
नरोदा इथं राहणारे युवराज सिंह (वय २६) यांची कृष्णानगर पोलिस ठाण्यात पोस्टिंग होती. ते अकाउंट विभागात कार्यरत आहे. कामासंदर्भात ते विभागीय कार्यालयात गेले होते. काम संपल्यावर ते कार्यालयातून बाहेर पडले असता पाय-यावरून उतरतांना त्यांना शिंका आल्या. जवळच उभ्या असलेल्या दोन जणांनी वाद घालत त्यांना मारहाण करण्यास सुरूवात केली. मी पोलिस असून कामासाठी इथं आलो आहे, असं युवराज यांनी सांगताच. संशयितांनी तीन साथीदारांना बोलावून आणखी मारहाण केली. स्थानिक लोकांनी पोलिसाला त्यांच्या तावडीतून कसेतरी वाचवले. या घटनेनंतर पोलिसांना पाचारण करण्यात आलं. ५ संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. रवी भारवाड, जगदीश भारवाड, भारत भारवाड, विपुल भारवाड, संजय भारवाड अशी संशयितांची नावे आहेत. या मारहाणीत युवराज सिंह यांचे नाक फ्रॅक्चर झाले असून, डोळ्यांना इजा झाली आहे, त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.