नवी दिल्ली/मुंबई – देशात पुन्हा एकदा ऑक्सिजन सिलींडर आणि रेमडेसिवीरचा काळाबाजार सुरू झाला आहे. आता हा काळाबाजार लोकांच्या जीवावर उठलेला आहे. अनेकांचे रेमडेसिविर मिळत नसल्याने आणि ऑक्सिजन उपलब्ध नसल्याने जीव जात आहेत. सरकारी प्रोटोकॉलमध्ये सामील असलेल्या या दोन्ही गोष्टींच्या किंमती हजार पटींनी वाढविण्यात आल्या आहेत. त्यामुळे रुग्णाला अॅडमिट होण्यापूर्वीच रेमडेसिविरची सोय करायला सांगितली जात आहे.
महाराष्ट्र, मध्यप्रदेश, दिल्ली आणि हरियाणासह देशाच्या अऩेक भागांमध्ये काळाबाजार सुरू असल्याच्या तक्रारी येत आहेत. तर दुसरीकडे रुग्णालयांमध्ये ऑक्सिजनची मागणी वाढली आहे. परंतु, पुरवठा शक्य होत नाही. अश्यात एक सिलिंडर ४० हजार रुपयांपर्यंत विकला जात आहे.
देशात रेमडेसिविरचा काळाबाजार गेल्या आठवड्यात सुरू झाला. २८ मार्चनंतर याची मागणी ५० पटींनी वाढली. अर्थात केंद्राने औषध कंपन्यांना उत्पादन वाढविण्याचे आदेश दिले आहे. मात्र सद्यस्थितीत देशात एका डोससाठी लोकांना दिड ते दोन लाख रुपये मोजावे लागत आहेत.









