चंदीगड (पंजाब) – मोहालीमध्ये कोरोना चाचणीसाठी संकलित करण्यात आलेल्या ११५ पैकी तब्बल १०६ नमुन्यांमध्ये ब्रिटनमधील नवीन कोरोना विषाणू आढळल्याने खळबळ उडाली आहे. या नमुने चाचणी अहवाल आल्यानंतर आरोग्य विभाग सतर्क झाला आहे. त्याच वेळी, शहरामध्ये कोरोनाचे ६८० नवीन रुग्ण आढळले तर तीन रुग्णांचा बळी गेला आहे.
चंदीगडमधील २४९, मोहालीतील ३०३ आणि पंचकुला येथील १२८ रूग्ण नव्याने संक्रमित झाले आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आरोग्य विभागाने अनेक आवश्यक पावले उचलली आहेत. या भागातील लोकांच्या सोयीसाठी जिल्हा प्रशासनाने चंदीगड विद्यापीठ परिसरात सुमारे १०० बेडचे आयसोलेशन सेंटर सुरू केले आहे. येथे डॉक्टर आणि इतर सुविधा देखील उपलब्ध असतील. त्याचबरोबर जिल्ह्यात यावेळी ११५ व्हेंटिलेटर उपलब्ध आहेत.
जिल्ह्यात सहा रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत. ब्रिटनमध्ये नवीन प्रकारच्या विषाणूचा प्रादुर्भाव झाल्यानंतर जिल्हा प्रशासन पूर्णपणे सतर्क आहे. तसेच, लोकांना कोरोना मार्गदर्शक तत्त्वांचे अनुसरण करण्याची सूचना देण्यात येत आहे.
चंदीगडच्या आरोग्य विभागाने दिवसभरात २००८ नमुन्यांची तपासणी केली, त्यापैकी २४९ रुग्ण संसर्गित असल्याचे आढळले. तथापि, अद्याप १४९ अहवाल येणे बाकी आहे. शहरात सक्रिय प्रकरणांची संख्या २१७८ पर्यंत वाढली आहे. त्याचवेळी, रुग्णालयात ठेवलेल्या १३६ रुग्णांना १० दिवसांची मुदत पूर्ण झाल्यानंतर डिस्चार्ज देण्यात आला.
दरम्यान, नवा स्ट्रेन इतक्या मोठ्या प्रमाणात आढळल्याने प्रशासन आणि सरकार सतर्क झाले आहे. कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी आरोग्य विभागाने तातडीच्या बैठकीचे नियोजन केले आहे. या स्ट्रेनचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्याचा निर्णय त्यात घेतला जाणार आहे. तसेच, आगामी काळात कडक निर्बंधही लागू केले जाण्याची चिन्हे आहेत.