नवी दिल्ली – भ्रष्टाचाराच्या गुन्ह्यामध्ये महाराष्ट्र अव्वलस्थानी पोहोचला आहे. राष्ट्रीय गुन्हा नोंद विभाग अर्थात एनसीआरबीतर्फे याबाबत माहिती जाहीर केली आहे. त्यात महाराष्ट्र राज्याचा क्रमांक प्रथम स्थानी असून भ्रष्टाचाराच्या दाखल झालेल्या गुन्ह्यांपैकी केवळ १४.९ टक्के गुन्ह्यांमध्ये शिक्षा झाल्याचे समोर आले आहे.
राष्ट्रीय गुन्हा नोंद विभागाने जाहीर केलेल्या माहितीनुसार महाराष्ट्रात सर्वाधिक ८९१ गुन्ह्याची नोंद झाली आहे. त्यापाठोपाठ राजस्थान दुसऱ्या क्रमांकावर आहे. राजस्थानमध्ये ४२४, तामिळनाडूत ४१८, कर्नाटक येथे ३७९, ओडिसा येथे ३५३ भ्रष्टाचाराच्या गुन्ह्याची नोंद झाली आहे. सर्वात कमी भ्रष्टाचार असलेल्या राज्यांमध्ये सिक्कीम, नागालॅंड, मिझोरम, मेघालय, मणिपूर आणि गोवा या राज्यांचा समावेश आहे. इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रातील गुन्ह्यांची संख्या दुप्पट असल्याचे दिसून येत आहे. भ्रष्टाचाराबाबत तक्रार करण्यासाठी नागरिक पुढे येत असल्याने गुन्हे अधिक असल्याचे आढळून आले आहे. मात्र दुसरीकडे भ्रष्टाचाराच्या गुन्ह्यात शिक्षा होण्याचे प्रमाण महाराष्ट्रात कमी आहे, त्यात महाराष्ट्र दुसऱ्या स्थानी आहे.